CM नवीन पटनायक यांचे विशेष सचिव निलंबित; ओडिशामध्ये निवडणूक आयोगाची मोठी कारवाई

Odisha Lok Sabha Election| लोकसभा निवडणुकींचे सहा टप्प्यातील मतदान पार पडले आहे. त्यानंतर आता सातव्या टप्प्यातील मतदान 1 जून रोजी होणार आहे. ओडिशामध्ये होणाऱ्या शेवटच्या टप्प्यातील निवडणुकीपूर्वी निवडणूक आयोगाने मुख्यमंत्री नवीन पटनायक यांचे विशेष सचिव डीएस कुटे यांच्यावर कारवाई केली आहे.
याशिवाय निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दीर्घकाळ रजेवर असलेले पोलीस महानिरीक्षक (सीएम सुरक्षा) आशिष कुमार सिंग यांना वैद्यकीय तपासणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
कोणत्या कारणामुळे केली कारवाई ?
दरम्यान, कुटे यांना निवडणूक प्रक्रियेत अनावश्यक हस्तक्षेप केल्याबद्दल आयोगाने त्यांना निलंबित केले आहे. कुटे हे 1997 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. निवडणूक आयोगाने त्यांचे मुख्यालय दिल्लीतील ओडिशाच्या निवासी आयुक्तांच्या कार्यालयात निश्चित केले होते. त्यांनी ओडिशाच्या मुख्य सचिवांना कुटे यांच्यावर गुरुवारपर्यंत आरोपपत्र जारी करण्यास सांगितले आहे. ओडिशाचे मुख्य निवडणूक अधिकारी (CEO) आरोपपत्राचा मसुदा मुख्य सचिवांना सादर करतील.
तर आयपीएस अधिकारी आशिष सिंग हे 4 मेपासून वैद्यकीय रजेवर आहेत. या संदर्भात, ओडिशाच्या सीईओ निवडणूक आयोगाने सांगितले आहे की, सविस्तर वैद्यकीय तपासणीसाठी त्यांना एम्स भुवनेश्वरच्या संचालकांनी स्थापन केलेल्या विशेष वैद्यकीय मंडळासमोर गुरुवारपर्यंत हजर राहावे लागेल.
दरम्यान, आयोगाच्या शिफारशीवरून सरकारने सिंग यांची एप्रिलमध्ये आयजी सेंट्रल रेंज या पदावरून बदली केली होती. निवडणूक आयोगाच्या शिफारसीनुसार एप्रिलमध्ये सहा आयपीएस आणि दोन आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या. Odisha Lok Sabha Election|
शेवटच्या टप्प्यात ओडिशातील 6 जागांवर निवडणूक
लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात ओडिशातील 6 जागांवर निवडणूक होणार आहे. त्याचवेळी विधानसभेच्या जागांवरही मतदान होणार असून त्याचा निकाल 4 जून रोजी समोर येणार आहे. ओडिशात भाजप आणि बीजेडी यांच्यात चुरशीची लढत होणार आहे. Odisha Lok Sabha Election|
हेही वाचा:
‘त्यांना तडीपार करायला पाहिजे…’; असदुद्दीन ओवेसींवर माधवी लता का चिडल्या?





