चवणेश्वर व परिसरात ढगफुटीसदृश पाऊस

सातारा – उत्तर कोरेगावमधील चवणेश्वर व परिसरात बुधवारी दुपारी ढगफुटीसदृश्य पाऊस झाला. सुमारे दोन तास झालेल्या या पावसामुळे चवणेश्वर घाटात दरडी कोसळल्या असून रस्त्याचे नुकसान झाले आहे. उत्तर कोरेगावमधील अनेक गावांना या पावसाचा फटका बसला असून खरीप हंगामातील पिके पाण्यात गेली आहेत. या पावसामुळे परिसरात मोठे नुकसान झाले आहे.
कोरेगाव आणि वाई तालुक्याच्या सीमेवर चवणेश्वर गाव डोंगरावर वसले असून या गावास पर्यटनस्थळाचा “क’ वर्ग दर्जा मिळालेला आहे. याठिकाणी दरवर्षी मोठ्या प्रमाणात पाऊस कोसळत असल्याने प्रशासनास सतर्कता बाळगावी लागते. यावर्षीही जून महिन्यापासून कमी अधिक प्रमाणात या परिसरात पाऊस झाला.
आज बुधवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास चवणेश्वर व परिसरात ढगफुटीसदृश्य पाऊस कोसळलो. सुमारे दोन तास झालेल्या या पावसामुळे खरीप हंगामातील पिकांचे नुकसान झाले असून शेतीचीही हानी झाली आहे. चवणेश्वर घाटातील रस्ता एक कोटी रुपये खर्च करुन नुकताच करण्यात आला होता. या पावसामुळे रस्त्यावर ठिकठिकाणी दरडी कोसळल्या आहेत.
गटारामध्ये पाणी ओव्हरफ्लो झाल्याने काही ठिकाणी रस्त्याचे नुकसानही झाले आहे. काही ठिकाणी दरडी कोसळल्याने अपघाताचा धोका संभवत असून या दरडी प्रशासनाने हटवाव्यात, अशी मागणी सरपंच दयानंद शेरे, युवराज शेरे, बजरंग पवार, हरिदास शेरे यांनी केली आहे. दरम्यान, चवणेश्वरलगत असलेल्या करजंखोप, रणदुल्लाबाद, सोनके व परिसरातील गावांनाही या पावसाचा मोठा फटका बसला आहे.
खरीप हंगामातील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. परिसरातील तलाव खचाखच भरले असून ओढे- नाले दुथडी भरुन वाहत आहेत. या पावसामुळे जीवितहानी झाली नसली तरी मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाली आहे. महसूल विभागाच्यावतीने नुकसानीचे पंचनामे करुन नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी करंजखोप येथील सामाजिक कार्यकर्ते पिलाजी धुमाळ यांनी केली आहे. त्याचप्रमाणे पावसामुळे नुकसान झालेल्या रस्त्यांची तात्काळ दुरुस्ती करावी, अशी मागणीही धुमाळ यांनी केली आहे.
चवणेश्वर व परिसरात झालेल्या ढगफुटीसदृश्य पावसामुळे कोठेही जीवितहानी झालेली नाही. मात्र, या पावसामुळे रस्ते व शेतपिकांचे नुकसान झाले आहे. परिसरातील गावचे सरपंच, पोलिस पाटील यांच्याशी संपर्क साधला असून गावकामगार तलाठी परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. चवणेश्वर घाट रस्त्यावर कोसळलेल्या दरडी हटवण्याबाबत बांधकाम विभागास सूचना करण्यात येणार आहे.
अमोल कदम, तहसीलदार, कोरेगाव





