चिपळूणच्या अडरे गावात ढगफुटी सदृश्य पाऊस; एका तासात 110 मी.मी पावसाची नोंद

चिपळूण – राज्यात एकीकडे काही भागांमध्ये उष्णतेची लाट आलेली असतानाच आता कोकणातीत चिपळूणात मात्र अवकाळी पावसाने कहर केला आहे. चिपळूणमधील अडरे गावात ढगफुटी झाली असल्याची माहिती समोर आली आहे.
एका तासात 110 मी.मी पाऊस पडला असल्याची नोंद करण्यात आली आहे. अचानकपणे जोरदार पाऊस बरसल्याने येथील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
आज रविवारी तासाभरातच चिपळूणमधील अडरे आणि अनारी गावात धडकी भरवणारा पाऊस झाला. या मुसळधार पावसामुळे अवघ्या तासाभरात येथील ग्रामस्थांचे जनजीवन विस्कळीत झाले. मे महिन्यातच आलेल्या या अवकाळी पावसाने येथील नद्यांना पूर आल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
महत्त्वाची बाब म्हणजे अडरे गावात पुलाचे बांधकाम सुरू होते. पण या पावसामध्ये ते साहित्य देखील वाहून गेले आहे. जुलै मध्ये ज्या प्रमाणात पाऊस पडतो, त्या प्रकारचा पाऊस येथील ग्रामस्थांनी मे महिन्यात अनुभवला आहे. या गावातील शेतांमध्ये पावसाचे पाणी जमा झाले असून नद्या दुथडी भरुन वाहात आहेत.
अडरे आणि अनारी या गावांमध्ये अचानक इतका पाऊस कसा झाला, याविषयी हवामान खात्याकडून अद्याप कोणतेही स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही. हवामान खात्याने राज्याच्या अनेक भागांमध्ये मुसळधार अवकाळी पावसाचा अंदाज वर्तविला होता.
परंतु, चिपळूणमध्ये अवघ्या अर्ध्या तासात प्रमाणाबाहेर पाऊस झाला आहे. एका तासात 110 मी.मी पाऊस पडला असल्याची नोंद करण्यात आली आहे.





