हिमाचल प्रदेशात ढगफुटी ! विविध दुर्घटनांमध्ये किमान 16 जण दगावले

नवी दिल्ली – हिमाचल प्रदेशात सोमवारी पावसाने कहर केला. त्यामुळे सिमला येथे येथे दोन भूस्खलन आणि सोलनमध्ये ढगफुटी झाली त्यात किमान 16 जण ठार झाले आहेत. मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सुखू यांनी सांगितले की, तुफानी पावसरात कोसळलेल्या समर हिल भागातील शिव मंदिराच्या ढिगाऱ्यातून नऊ मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत आणि फागली परिसरातील अनेक घरे माती आणि गाळाखाली गाडली गेली आहेत.
तेथे आणखी अनेक जण अडकल्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. सोलन जिल्ह्यात ढगफुटीत एकाच कुटुंबातील सात जणांचा मृत्यू झाला. रविवारी रात्री ढगफुटीमुळे सोलन येथील दोन घरे वाहून गेली. एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की,तेथील सहा जणांची सुटका करण्यात आली, तर जादोन गावात सात जणांचा मृत्यू झाला.
सिमल्यात झालेल्या भूस्खलनात अनेक जण अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. राज्य आपत्कालीन ऑपरेशन केंद्राने दिलेल्या माहितीनुसार आपत्तीमुळे राज्यात 752 रस्ते बंद करण्यात आले आहेत. आज राज्यातील सर्व शाळा, महाविद्यालये बंद ठेवण्यात आली होती.





