परिवहन विभागाचे तपासणी नाके बंद करा

सातारा – सरकारच्या आदेशाप्रमाणे प्रत्येक राज्याने सीमावर्ती भागात उभारलेले परिवहन विभागाचे तपासणी नाके बंद करण्याच्या मागणी एआयएमटीसीचे मॅनेजिंग कमिटीचे संचालक प्रकाश गवळी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.
निवेदनात म्हटले आहे, प्रत्येक राज्याच्या सीमावर्ती भागात असणारे तपासणी नाके बंद करावेत, यासाठी एआयएमटीसी व राज्यनिहाय प्रमुख वाहतूक संघटना प्रयत्नशील आहेत. याच मागणीसाठी गुजरात, मध्यप्रदेशमधील वाहतूकदारांनी बंदचा निर्णय घेतला होता. या इशाऱ्यानंतर त्या दोन राज्यांनी तपासणी नाके बंद करण्याचा निर्णय घेतला. महाराष्ट्रात सुद्धा याचप्रश्नी अनेकवेळा राज्य शासनाशी बैठक झाल्या. मात्र, त्यातून ठोस निर्णय झालेला नाही.
यामुळे पुन्हा एकदा वाहतूकदारांच्या वतीने संघटना निवेदन देत असल्याचे त्यात नमूद केले आहे. वाहतूकदारांच्या समस्यांबाबत नेमलेल्या समितीचा अहवाल देखील शासनास मिळाला आहे. यातील तरतुदींचा अभ्यास करत तपासणी नाक्यांबाबत योग्य ती कार्यवाही करण्याची मागणीही निवेदनात केली आहे. मुख्यमंत्री शिंदे यांनी वाहतूकदारांच्या समस्यांबाबत लवकरच संघटनांची बैठक बोलावण्याचे आश्वासन दिले. सरकारने जर याबाबत योग्य निर्णय न घेतल्यास वाहतूकदार वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत आहेत, असे गवळी यांनी सांगितले. यावेळी रवींद्र चव्हाण, बाबा शेख, निखिल पाटील व इतर उपस्थित होते.





