Satara News : भैरवनाथ डोंगर सलग २७ वेळा केला चढउतार

लोणंद : लोणंद येथील श्री भैरवनाथ डोंगर ग्रुपचे क्रियाशील सदस्य संतोष कोकरे व राजेंद्र शेळके यांनी भैरवनाथ डोंगर २७ वेळा सलग चढून उतरून सुमारे ५४ किलोमीटर अंतर पावणेअकरा तासांमध्ये पूर्ण केला. पर्यावरण व निरोगी आरोग्याचा संदेश देण्यासाठी उपक्रम यशस्वी केल्याने, राजेंद्र शेळके व संतोष कोकरे या अवलियांचे अभिनंदन करण्यात होत आहे.
राजेंद्र शेळके व आयर्न मॅन संतोष कोकरे यांनी सोमवारी रात्री १० वाजता भैरवनाथ डोंगर चढण्यास व उतरण्यास सुरुवात केली. सुमारे १ किलोमीटर अंतर लांबीचा डोंगर एकदा चढून व उतरून दोन किलोमिटर अंतर होत आहे.
राजेंद्र शेळके, संतोष कोकरे यांचा आगळावेगळा विक्रम असे सुमारे २७ वेळा डोंगर चढ उतार करून सुमारे ५४ किलोमिटरचे अंतर पावणेअकरा तासांत पूर्ण करण्याचा विक्रम केला. सोमवारी (दि. ७) रात्री दहा वाजता सुरू केलेला उपक्रम मंगळवारी दुपारी पूर्ण झाला.
श्री भैरवनाथ डोंगर ग्रुप गेली आठ वर्षांपासून या डोंगरावर वृक्ष लागवड करून, या वृक्षांचे यशस्वी संगोपन करत आहे. डोंगरावर पाण्याची कोणतीही सोय नसताना, आतापर्यंत सुमारे २०० झाडांचे यशस्वी संगोपन करण्यात आले आहे. ‘झाडे लावा, झाडे जगवा’ हा संदेश देण्याबरोबरच, प्रत्येकाने आपले आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी दररोज चालावे व पळावे यासाठी आपण हा उपक्रम केल्याचे राजेंद्र शेळके व संतोष कोकरे यांनी सांगितले.
डोंगर चढउताराचा हा प्रवास २ किलोमीटर अंतराचा होता. रात्रीच्या वेळी या डोंगरावर कोल्हा, लांडगा, ससे, सायाळ, खोकाड असे प्राणीही आढळून आले. मात्र तरीही न घाबरता उपक्रम पूर्ण केला. भैरवनाथ डोंगराचा हा उपक्रम दिसत होता, तेवढा सोपा नव्हता, हे तो पूर्ण केल्यानंतर समजून आले.
या उपक्रमासाठी त्यांना वरुण क्षीरसागर, इरफान मोकाशी, शुभम क्षीरसागर यांनी रात्रभर सहकार्य केले. त्याचबरोबर श्री भैरवनाथ डोंगर ग्रुपच्या सदस्यांनीही सहकार्य केले. श्री भैरवनाथ डोंगर ग्रुपच्यावतीने राजेंद्र शेळके व संतोष कोकरे यांचा रानफुलांचा बुके देऊन सत्कार करण्यात आला.





