Unicef India : राज्यासह देशभरात हवामान बदलामुळे दुष्काळ, तापमान वाढीमुळे अनेक क्षेत्रांवर परिणाम झाल्याचे दिसून येत आहे. आता कुपोषणाच्या कारणांमध्ये हवामान बदल हासुद्धा एक प्रमुख घटक असल्याचे युनिसेफ मानते. हवामान बदलामुळे विविध प्रकारे पोषणावर परिणाम होत आहे. महाराष्ट्रातील दुष्काळ, उष्णतेची लाट आणि कृषी क्षेत्रावर कोसळलेली संकटे यांचा परिणाम कुपोषणावर झालेला दिसत असून भविष्यात याचा धोका वाढला आहे. यामुळे मातेच्या पोषणाला प्राधान्यक्रम देण्याचे आवाहन युनिसेफने केले आहे. मातेचे पोषणविषयक प्राधान्यक्रम आणि समावेशक प्रारंभिक बाल्यावस्थेतील विकास या विषयावर युनिसेफ-इंडिया आणि पत्र सूचना कार्यालय यांच्यातर्फे बुधवारी आयोजित क्षमता निर्मिती कार्यशाळेत तत्संबंधी चर्चा झाली. यातून पुढे आलेल्या मुद्द्यांनुसार असे दिसून आले आहे की, गर्भाच्या आणि बाळाच्या मेंदूच्या विकासाच्या महत्त्वाच्या काळात हवामान बदल गर्भवती महिलांवर परिणाम करतो. युनिसेफच्या ज्येष्ठ सल्लागार डॉ. मृदुला फडके म्हणाल्या, प्रारंभिक बाल्यावस्था विकासाच्या काळातील पोषणाचा अभाव गर्भावर परिणाम करून गर्भातील जिवाला आयुष्यभरासाठी मधुमेह, उच्च रक्तदाब तसेच हृदय आणि रक्तवाहिन्यांशी संबंधित गुंतागुंतीसारखे आजार जडण्याची स्थिती निर्माण होते. जेव्हा एखादी गर्भवती महिला आहारविषयक असुरक्षितता, हृदयावर ताण किंवा शारीरिकदृष्ट्या थकवणारे बाळंतपण यांना सामोरी जाते तेव्हा फक्त तिच्याच आरोग्याला धोका निर्माण होतो असे नव्हे तर तिच्या बाळाचे आरोग्य आयुष्यभरासाठी धोक्यात येऊ शकते, असे त्यांनी सांगितले. दरम्यान, गर्भाचा आणि गर्भावस्थेतील बाळाच्या अगदी सुरुवातीच्या काळात बाळाच्या शरिराच्या चयापचयाची प्रक्रिया निश्चित होते. या टप्प्यात कमी पोषण मिळाले तर बाळाच्या आयुष्यात नंतरच्या काळात लठ्ठपणा, इन्सुलिन प्रतिकार तसेच टाईप २ प्रकारचा मधुमेह, उच्च रक्तदाब आणि हृदयरोग आणि मानसिक आजार होण्याची शक्यता बळावते. ६० लाखांहून अधिक मुलांवर परिणाम महाराष्ट्रात बाल्यावस्थेतील असंसर्गजन्य आजार (एनसीडी) वेगाने एक आपत्कालीन परिस्थिती बनत आहेत. त्याचा परिणाम राज्यातील ६० लाखांहून अधिक मुलांवर होतो आहे. पूर्वी केवळ प्रौढांमध्ये आढळणारे आजार – मधुमेह, दमा, जन्मजात हृदयरोग, सिकल सेल आणि स्थूलता हे आता वाढत्या प्रमाणात मुलांमध्ये दिसत आहेत.