SSC Exam: 10 वीचा मराठी भाषेचा पेपर फुटला; आमदार रोहित पवार यांचा सरकारवर निशाणा

Rohit Pawar on SSC Exam – आज मातृभाषा दिन असून दिल्लीत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन सुरु झाले आहे. त्याची आजच सुरुवात झाली आहे. असे असताना महाराष्ट्रामध्ये मराठी भाषेचा पेपर फुटत असेल तर हे दुर्दैव असल्याचे रोहित पवार यांनी म्हटले आहे. लगे रहो महायुती सरकार, असे म्हणत त्यांनी राज्यातील महायुती सरकारवर टीका केली. आता महाराष्ट्र थांबणार नाही, या महायुती सरकारच्या घोषवाक्याचा देखील रोहित पवार यांनी खोचक शब्द उल्लेख केला. फोडाफोडी हा सध्याच्या राज्य सरकारचा स्थायीभाव आहे. त्यामुळेच दहावीचा मराठीचा पेपर देखील फुटला असल्याची टीका शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी केली आहे.
दरम्यान, आजपासून दहावी बोर्डाची परीक्षा सुरू झाली आहे. मात्र जालना जिल्ह्यातील बदनापूर येथे परीक्षा सुरू झाल्याच्या काही वेळातच मराठीचा पेपर लीक झाल्याची माहिती समोर आली आहे. परीक्षेच्या पहिल्या दिवशी कॉपी मुक्त अभियानाचा फज्जा उडाला. एकीकडे प्रशासनाच्या वतीने कॉफी मुक्त अभियानाची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याचा दावा केला जात आहे. तर दुसरीकडे पहिल्याच मराठीचा पेपर जालना जिल्ह्यामध्ये लीक झाला. एवढेच नाही तर केवळ वीस रुपयात परीक्षा केंद्र बाहेर पेपरची कॉपी मिळत होती, असा देखील आरोप केला जात आहे. त्यामुळे आता या संदर्भात शिक्षण विभाग काय निर्णय घेतो? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
संबंधित अधिकाऱ्यांकडून अहवाल मागवला – वैशाली जामदार
या संदर्भात विभागीय शिक्षण मंडळाच्या सचिव डॉक्टर वैशाली जामदार यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना माहिती दिली. छत्रपती संभाजीनगर शिक्षण मंडळाच्या वतीने संबंधित अधिकाऱ्यांकडून अहवाल मागवण्यात आला आहे. या प्रकरणाचे कोणी दोषी असेल त्यांच्यावर नियमानुसार कारवाई केली जाणार असल्याचेही जामदार यांच्या वतीने सांगण्यात आला आहे.






