मोहरी तलाव फुटण्याचा धोका टळला! आमदार रोहित पवार यांच्या तत्परतेने संकटावर मात

जामखेड: जामखेड तालुक्यातील मुसळधार पावसामुळे खर्डा येथील मोहरी तलावाच्या सांडव्यात मोठे भगदाड पडल्याने तलाव फुटण्याचा धोका निर्माण झाला होता. यामुळे सोनेगाव, धनेगाव, चिंचपूर, जवळके, तरडगाव या गावांमध्ये भीतीचे वातावरण पसरले. मात्र, आमदार रोहित पवार यांच्या तत्परतेमुळे संकटावर मात करण्यात यश आले आहे.
रोहित पवार यांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. प्रशासनाकडे साधनसामग्री उपलब्ध नसल्याने त्यांनी स्वखर्चातून तीन पोकलँड, जेसीबी आणि एक हजार सिमेंटच्या गोण्या उपलब्ध करून दुरुस्तीचे काम सुरू केले. स्वतः उपस्थित राहून त्यांनी कामाला गती दिली. सध्या तात्पुरते दुरुस्तीचे काम सुरू असून, पावसाने उघडीप दिल्यावर कायमस्वरूपी दुरुस्ती केली जाईल.
मोहरी तलाव हा मोहरी, खर्डा, जायभायेवाडी गावांसाठी पाणीपुरवठ्याचा आणि शेतीसाठी महत्त्वाचा आधार आहे. तलाव फुटला असता तर पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आणि पूराचा धोका निर्माण झाला असता. रोहित पवार म्हणाले, “नागरिकांनी काळजी करू नये. तलाव सुरक्षित ठेवण्यासाठी प्रशासन आणि कार्यकर्त्यांच्या मदतीने काम पूर्ण केले जाईल.” त्यांच्या या प्रयत्नांमुळे गावकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.





