Pune District : राष्ट्रवादीचे कार्यकर्ते व मुख्याधिकाऱ्यांमध्ये खडाजंगी; दौंडमध्ये मतदार याद्यांमध्ये गोंधळ

दौंड : दौंड नगरपालिकेत मतदार याद्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर घोळ झाला असून याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे माजी जिल्हा परिषद सदस्य वीरधवल जगदाळे व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रदेश प्रवक्त्या वैशाली नागवडे यांच्या नेतृत्वाखाली मुख्याधिकारी अवधूत तावडे यांना याबाबत माहिती विचारली. परंतु त्यांनी समाधानकारक उत्तरे न दिल्याने राष्ट्रवादीचे कार्यकर्ते व मुख्याधिकारी यांच्यात शाब्दिक चकमक उडाली. मुख्याधिकारी यांच्या विरोधात मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी झाली.
मुख्याधिकारी हे कोणाच्या दावणीला बांधून काम करत आहे, असा आरोप त्यांनी यावेळी केला. वीरधवल जगदाळे म्हणाले की, दौंड नगरपालिका हद्दीमध्ये 5000 पेक्षा अधिक नावे इतरत्र गेलेली आहे. यावर हरकती मागवण्यात आल्या होत्या. परंतु अनेकांना हे माहीत नव्हते आपले नाव इतरत्र गेले आहे. वेळ टाळल्यानंतर काहींच्या लक्षात आले त्यांनी यांच्यावर आक्षेप घेतला. परंतु लेखी आक्षेप घेताना ज्यांचे नाव इतरत्र गेले आहे.
त्यांनी घेतलं नाही त्यांच्या जागी तिऱ्हाईत माणसानेच अर्ज दिलेला असून यामध्ये त्यांनी निवडणूक आयोगाच्या सूचनेप्रमाणे कोणताही पुरावा जोडलेला नाही. केवळ कोऱ्या कागदावर हे आक्षेप घेतलेले आहेत. त्यामुळे प्रकरण अधिकच चिगळले मुख्याधिकारी हे कोणाच्यातरी दावणीला बांधून काम करत आहेत ते मनमानी कारभार करतात निवडणूक आयोगाचे देखील मानत नाही जिल्हा अधिकाऱ्यांना खोटी माहिती देतात असे एक ना अनेक आरोप केले.
हा गोंधळ सुरू असतानाच पालकमंत्री अजित पवार यांच्या कानावर ही गोष्ट घालण्यात आली. त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना या गोष्टीची पडताळणी करण्यास सांगितले. एवढे होऊन देखील मुख्याधिकारी अवधूत तावडे यांना काही घाम फुटेना. त्यांनी यावर कोणतेही स्पष्टीकरण देण्यास स्पष्टपणे नकार दिला माझे काम वरिष्ठांच्या सूचनेप्रमाणे चालू आहे एवढेच त्यांनी सांगितले.त्यामुळे प्रकरण अजून चिघळले व राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारच्या गटाने मुख्याधिकाऱ्यांच्या दालनातच हे आंदोलन केले.
दोन वाजता सुरू झालेल्या आंदोलन सायंकाळी सहा वाजले तरी संपले नव्हते. अखेर मुख्याधिकाऱ्यांनी पोलिसांना पाचारण केले पोलीस काही तोडगा काढतील असे नागरिकांना वाटत होते परंतु तसे काही घडले नाही. कार्यकर्ते आपल्या मागणी व ठाम होते.यामध्ये प्रामुख्याने गुरमख नारंग, वसीम शेख, जिवराज पवार, स्वप्निल शहा, सोनू धनवे, नितीन दोरगे यांनी भाग घेतला.
ही गोष्ट दौंड शहरात वाऱ्यासारखे पसरली. त्यानंतर नागरी हित संरक्षण मंडळाचे कार्यकर्ते देखील दौंड नगरपालिकेत आले व त्यांनी देखील ठिय्या मांडला व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या विरोधात घोषणाबाजी सुरू केली. दोन्ही बाजूनी घोषणाबाजी होत असताना नगरपालिकेत वातावरण चांगले तप्त झाले होते.
एकमेकांविरुद्ध घोषणाबाजी
नागरिक हे संरक्षण मंडळाचे कार्यकर्ते अकबर सय्यद, योगेश कटारिया, अमित सोनवणे (पीआरपी गट), बापू वाघमारे, अमोल काळे, विशाल माशाळकर, निखिल शिंदे, राजु बारवकर यांनी या आंदोलनात भाग घेतला. यामध्ये प्रामुख्याने पोलिसांची तारेवर कसरत झाली. दोन्ही गटाचे कार्यकर्ते घोषणाबाजी करत असताना पोलीस त्यांना शांत करत होते. परंतु कार्यकर्ते काही शांत होण्याच्या मनस्थितीत नव्हते दोन्ही बाजूकडून प्रचंड घोषणाबाजी झाली.





