मुंबईत काँग्रेसच्या आंदोलनात पोलिसांशी झटापट; खासदार वर्षा गायकवाड जखमी

मुंबई : नेशनल हेराल्डप्रकरणी काँग्रेस नेत्या सोनिया गांधी, राहुल गांधी यांच्यासह अन्य नेत्यांविरोधाका आरोपपत्र दाखल करण्याच्या निषेधार्थ काँग्रेसतर्फे मुंबईच्या अंमलबजावणी संचालनालय (ईडी) कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. या आंदोलनावेळी पोलिसांसोबत झालेल्या झटापटीत मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा व खासदार वर्षा गायकवाड या किरकोळ जखमी झाल्या आहेत. त्यांना तातडीने जी. टी. रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे त्यांच्यावर उपचार करण्यात आले. National Herald case।
काँग्रेसच्या नॅशनल हेराल्ड वृत्तपत्र आणि असोसिएटेड जर्नल्स लिमिटेड (एजेएल) शी संबंधित मनीलाँड्रिंग प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) मंगळवारी पहिले आरोपपत्र दाखल केले. यामध्ये सोनिया गांधी, राहुल गांधी, सॅम पित्रोदा आणि सुमन दुबे यांची नावे आहेत. या विरोधात काँग्रेस देशभरात आंदोलन करत आहेत. तर मुंबई काँग्रेसच्या वतीनेदेखील मुंबईतील ईडी कार्यालयाबाहेर निदर्शने करण्यात आली. या दरम्यान ही घटना घडली आहे.
विरोधी नेत्यांना धमकावण्यासाठी सरकारी एजन्सींचा वापर : काँग्रेस
नॅशनल हेरॉल्ड प्रकरणात ईडीने दाखल केलेले आरोपपत्र पूर्णपणे सूडाचे राजकारण आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा विरोधी नेत्यांना धमकावण्यासाठी सरकारी एजन्सींचा वापर करत आहेत,” असा आरोप काँग्रेसने केला आहे, परंतु भाजपनेही यावर प्रतिक्रिया दिली आहे.
भाजपचे प्रवक्ते आणि माजी केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी आज एक पत्रकार परिषदेत, “सोनिया आणि राहुल गांधी जामिनावर बाहेर आहेत, सोनिया आणि राहुल यांनी खटला संपवण्यासाठी उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली पण त्यांना कोणताही दिलासा मिळाला नाही. राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांनी उत्तर द्यावे की कायद्याला त्याचे काम करू द्यावे की नाही? नरेंद्र मोदींचे सरकार, कायद्याला त्याचे काम करू देईल.”असे म्हटले आहे.
ईडीने आरोपपत्रात काय म्हटले आहे?
ईडीने त्यांच्या आरोपपत्रात असा आरोप केला आहे की सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांनी नॅशनल हेरॉल्ड वृत्तपत्राचे प्रकाशक असोसिएटेड जर्नल्स लिमिटेड (एजेएल) यांच्या २००० कोटी रुपयांच्या मालमत्ता हडप करण्यासाठी गुन्हेगारी कट रचला होता. ईडीने म्हटले आहे की, एका कटाचा भाग म्हणून त्यांनी कंपनीचे ९९% शेअर्स फक्त ५० लाख रुपयांना विकले. एजेएलच्या या मालमत्ता यंग इंडियन या खाजगी फर्मने खरेदी केल्या आहेत आणि या फर्मचे मालक सोनिया आणि राहुल गांधी आहेत. भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी २०१४ मध्ये या प्रकरणात तक्रार दाखल केली होती आणि गांधी कुटुंब आणि इतर वरिष्ठ काँग्रेस नेत्यांवर गुन्हेगारी कट रचल्याचा आरोप केला होता. National Herald case ।





