Belsar Toll Plaza : पुरंदरच्या भूमिपुत्रांना टोलमाफी द्या! बेलसर टोल नाक्यावर राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे आक्रमक आंदोलन
Belsar Toll Plaza : राष्ट्रवादी (अजित पवार गट) आणि काँग्रेसचे नेते टोलनाक्यावर; पुरंदरमधील स्थानिकांना शंभर टक्के टोलमाफी देण्याची आग्रही मागणी.

Belsar Toll Plaza – पुणे- पंढरपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ९६५ तक्रारवाडी फाटा बेलसर टोल प्लाझावर स्थानिक भूमिपुत्र पुरंदरवासीयांना टोलमाफी मिळावी अशी मागणी करत राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) वरिष्ठ नेत्यांनी रविवारी (दि.२६) टोलनाक्यावर आंदोलन केले. यावेळी राष्ट्रवादी, कॉंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी आंदोलन केल्याने आंदोलनाची धग वाढणार आहे.
यावेळी पुणे जिल्हा बँकेचे अध्यक्ष डॉ. दिगंबर दुर्गाडे, ज्येष्ठ नेते जालिंदर कामठे, जिल्हा परिषद सदस्या डॉ. प्राजक्ता दुर्गाडे, तालुकाध्यक्ष उत्तम धुमाळ, सासवड शहराध्यक्ष वामन जगताप, महिला अध्यक्षा वंदना जगताप, लता दोडके, दशरथ यादव, सभापती अमित झेंडे देवसंस्थान विश्वस्त मंगेश घोणे आदींसह जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. येत्या काही दिवसांमध्ये स्थानिक भूमीपुत्रांना पूर्णतः टोलमाफी करण्याचा ठोस निर्णय झाला नाही तर रस्ता रोको करण्यात येणार असल्याचे जालिंदर कामठे यांनी सांगितले.
कॉंग्रेसकडून जोरदार घोषणाबाजी
दरम्यान, काॅंग्रेस पक्षाच्या वतीने सुद्धा टोलनाक्यावर आंदोलन करण्यात आले असून जिल्हा युवक अध्यक्ष उमेश पवार, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य दत्तात्रय झुरंगे यांच्यासह तालुक्यातील कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी व जागर करत निवेदन दिले आहे. उमेश पवार, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य दत्तात्रय झुरंगे यांनी हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी आंदोलनात उडी घेतल्याने याप्रकरणात आंदोलनाची व्याप्ती वाढण्याची चिन्हे दिसत आहेत.
टोलनाक्यावर वाहन चालक हैराण, त्रुटी
चार दिवसांपूर्वी टोलवसुली सुरू केलेल्या बेलसर टोलनाक्यावर अनेक अडचणींचा सामना वाहनचालकांना करावा लागत आहे. स्वच्छतागृहे सुरू नाहीत. महिला स्वच्छतागृहांची दारे फुटलेली आहेत. टोलकार्यालयाच्या इमारतीच्या पायऱ्या चुकीच्या आहेत. दुचाकीस्वारांना मोठी कसरत करावी लागत आहे. टोलवसुलीस विलंब लागत असल्याने वाहनचालकांना नाहक वेळ वाया जात आहे.
जाण्या- येण्यासाठी एकच टोलप्लाझा झाल्याने वाहनांच्या लांबचलांब रांगा लागत आहेत. इन आणि आऊटसाठी दोन स्वतंत्र टोलप्लाझा निर्माण व्हायला हवे होते, अशा संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. मुळात टोलप्लाचाी जागा चुकीची असल्याचे मत वाहनचालक व्यक्त करीत आहेत.






