Pune News : आयुक्तांशी भिडणं पडलं महागात; मनसे कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल

Pune News : महापालिका आयुक्तांना निवेदन देण्यासाठी आलेल्या मनसे कार्यकर्ते आणि महापालिका आयुक्तांमध्ये मंगळवारी राडा झाला. यावेळी निवेदन देण्यासाठी आलेले कार्यकर्ते आयुक्तांच्या अंगावर धावून गेल्याने मोठा गोंधळ उडाला होता. त्यामुळे महापालिकेत एकच धावपळ उडाली. या घटनेनंतर आयुक्तांनी थेट पोलिस आयुक्तांकडे तक्रार केली होती. आता या प्रकरणात मनसे कार्यकर्त्यांनावर गुन्हा दाखल झाला आहे.
मनसे नेते अॅड. किशोर शिंदे आणि पदाधिकाऱ्यांवर BNSS 132 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुणे महापालिकेने झालेल्या राड्यानंतर पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती. त्यानुसार पोलिसांनी ही कारवाई केली आहे. सदर पदाधिकाऱ्यांनी महापालिकेच्या कर्मचाऱ्यांच्या कामात अडथळा निर्माण केला होता. त्यानुसार पुणे पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम १३२ नुसार कारवाई केली आहे.
नेमकं काय घडलं?
महापालिका आयुक्त मंगळवारी दुपारी महापालिकेच्या शहर स्वच्छतेची बैठक घेत होते. यावेळी मनसेचे माजी नगरसेवक किशोर शिंदे हे महापालिका आयुक्त बंगल्यात गायब झालेल्या सामानाच्या प्रकरणी निवेदन देण्यासाठी आयुक्त कार्यालयात आले. मात्र, बैठक सुरू असल्याने त्यांनी भेट नाकारली.
त्यामुळे शिंदे यांच्यासह संतापलेल्या कार्यकर्त्यांनी बैठक सुरू असलेल्या हॉलमध्ये प्रवेश करत, “आयुक्तांना बैठकीसाठी आम्ही थांबायचे का?” असा जाब विचारला. त्यानंतर आयुक्तांनी “तुमचे निवेदन द्या, मग बघू” असे सुनावले. त्यानंतर आयुक्त आणि किशोर शिंदे यांच्यात शाब्दिक वाद झाला. त्याचे पर्यवसन काही वेळात एकमेकांच्या अंगावर धावून जाण्यात झाले.
यावेळी आयुक्तांनी “आम्हाला गुंड म्हणाले असून, तुला बघून घेतो, घरात घुसून मारतो” अशी धमकी दिल्याचा आरोप शिंदे यांनी केला. तर शिंदे आणि त्यांच्या सोबत आलेले कार्यकर्ते निवेदन देण्यासाठी नाही, तर मारण्याच्या उद्देशाने आल्याचा आरोप महापालिका आयुक्त राम यांनी केला आहे.
मनसेचे ठिय्या आंदोलन, रात्री उशीरापर्यंत गोंधळ
या घटनेनंतर मनसेचे निवेदन देण्यासाठी आलेले कार्यकर्ते आयुक्तांच्या कार्यालयाबाहेर ठिय्या आंदोलनास बसले. त्यानंतर काही वेळातच आयुक्तांच्या दालनाबाहेर मोठ्या प्रमाणात मनसे कार्यकर्ते जमले आणि त्यांनी घोषणाबाजी सुरू केली. त्यामुळे महापालिकेकडून सगळी प्रवेशद्वारे बंद करण्यात आली. या घटनेवेळी मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्तही तैनात करण्यात आला होता. तर महापालिकेने दरवाजे बंद केल्याने अनेक कर्मचारीही महापालिकेत अडकून पडले. रात्री उशिरापर्यंत हा गोंधळ सुरू होता.
अभियंता संघाकडून निषेध
या घटनेनंतर आता पुणे महापालिकेत गुरुवारी कामगारांकडून काम बंद आंदोलन करण्यात येणार आहे. बुधवारी झालेल्या घटनेचा निषेध म्हणून अभियंता संघाकडून आंदोलन करण्यात येणार आहे.
हेही वाचा : विश्रांतीनंतर पावसाची पुन्हा होणार एन्ट्री; पुढील २४ तासांत राज्यात पावसाची शक्यता





