विश्रांतीनंतर पावसाची पुन्हा होणार एन्ट्री; पुढील २४ तासांत राज्यात पावसाची शक्यता
Maharashtra Weather Update | काही दिवसांच्या विश्रांतीनंतर पुन्हा एकदा राज्यातील काही भागात पावसाने एन्ट्री घेतली आहे. पुढील चार ते पाच दिवस राज्यात मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. या कालावधीत कोकणेसह मराठवाड्यात पावसाचा जोर अधिक असण्याची शक्यता वर्तवली आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, तामिळनाडूच्या किनाऱ्यालगत समुद्रसपाटीपासून चक्राकार वारे वाहत आहेत. त्यापासून पूर्व मध्य अरबी समुद्रापर्यंत हवेचा पूर्व पश्चिम कमी दाबाचा पट्टा कायम असल्याने सध्या राज्यात पावसासाठी पोषक वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे पुढील चार ते पाच दिवसांच्या कालावधीत मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, विदर्भाचा काही भाग आणि कोकणात मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
मध्य महाराष्ट्रात अहिल्यानगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर येथे गुरुवारी आणि शुक्रवारी मेघगर्जनेसह पाऊस पडू शकेल. छत्रपती संभाजीनगर जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव येथे शुक्रवारी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊसपडू शकतो.
विदर्भात भंडारा, चंद्रपूर, गोंदिया, नागपूर, वर्धा, यवतमाळ येथे मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. तर मुंबई, ठाणे, पालघर या परिसरात हलक्या सरींची शक्यता असून दक्षिण कोकणामध्ये मेघगर्जनेसह पाऊस पडण्याचा अंदाज आहे. Maharashtra Weather Update |
उकाडा वाढला…
विदर्भातील अनेक ठिकाणी गेले आठवडाभर पावसाने दडी मारल्याने उकाडा वाढला आहे. चंद्रपुरात मंगळवारी तापमान ३६ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले होते. वर्धा येथे ३५.५ अंश सर्वाधिक कमाल तापमानाची नोंद झाली. याशिवाय मुंबईतही तापमानाचा पारा वाढला होता. त्यामुळे गेले काही दिवस असह्य उकाडा सहन करावा लागत आहे. मात्र काही भागात बुधवारी पाऊस पडल्याने तापमानात घट झाली आहे. Maharashtra Weather Update |
हेही वाचा :





