CJP Protest : कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनात संयुक्त राष्ट्र मानवाधिकार आयोगाची एंट्री; व्यक्त केली चिंता
CJP Protest : दिल्लीतील CJP आंदोलनात हजारो जणांना ताब्यात घेतल्याच्या वृत्तावर संयुक्त राष्ट्र मानवाधिकार आयोगाने चिंता व्यक्त केली. शांततापूर्ण आंदोलनाचा अधिकार जपण्याचे आवाहन.

CJP Protest : मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात दिल्लीमध्ये सुरू असलेल्या कॉकरोच जनता पार्टीच्या (CJP) आंदोलनावरून आता संयुक्त राष्ट्र मानवाधिकार आयोगाने चिंता व्यक्त केली आहे.
आंदोलनापूर्वी आणि आंदोलनादरम्यान प्रदर्शनकर्ते, नेते, सामाजिक संस्थांचे सदस्य, वकील आणि पत्रकारांना मोठ्या संख्येने ताब्यात घेतल्याच्या बातम्या समोर आल्याचे आयोगाने म्हटले आहे. अधिकाऱ्यांनी संयम बाळगावा आणि शांततेत आंदोलन करण्याच्या अधिकाराचा आदर करावा, असे आवाहन आयोगाने केले आहे.
आयोगाने म्हटले आहे की, शांततापूर्ण आंदोलनांवर लावण्यात येणारे निर्बंध गरजेचे आणि योग्य असले पाहिजेत. कायदा अंमलबजावणी करणाऱ्या यंत्रणांनी शांततापूर्ण आंदोलकांशी संयमाने वागावे, असेही आयोगाने स्पष्ट केले.
मनमानी ताब्यात घेतलेल्यांना सोडण्याची मागणी –
ज्यांना मनमानी पद्धतीने ताब्यात घेण्यात आले आहे, त्यांना तातडीने आणि कोणत्याही अटीशिवाय सोडण्यात यावे, अशी मागणी संयुक्त राष्ट्र मानवाधिकार आयोगाने केली आहे. तसेच आंदोलकांच्या मागण्यांवर तोडगा काढण्यासाठी अधिकाऱ्यांनी त्यांच्याशी अर्थपूर्ण चर्चा करावी, असेही आयोगाने म्हटले आहे.
दिल्ली पोलिसांनी अनेकांना सोडले –
CJPच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिल्ली पोलिसांनी मोठ्या संख्येने आंदोलकांना ताब्यात घेतले होते. अधिकृत माहितीनुसार सुमारे ७ हजार जणांना ताब्यात घेण्यात आले. त्यापैकी बहुतांश जणांना १० ते १२ किलोमीटर दूर नेऊन नंतर सोडण्यात आल्याचे वृत्त आहे. अरविंद केजरीवाल आणि ममता बॅनर्जी यांच्यासह अनेक नेत्यांनाही सोडण्यात आले आहे.
मात्र, अभिजीत दीपके, सौरव दास आणि आशुतोष रांका यांच्याबाबत अद्याप स्पष्ट माहिती समोर आलेली नाही. दरम्यान, CJPने रविवारी पुन्हा आंदोलन करण्याची घोषणा केली आहे.





