CJP Protest : दिल्लीतील राड्यावर संजय राऊतांची केंद्र सरकार आणि सरन्यायाधीशांवर तुफान टीका
NEET पेपरफुटी प्रकरणी केंद्रीय शिक्षणमंत्र्यांनी तात्काळ राजीनामा द्यावा या प्रमुख मागणीसाठी नवी दिल्लीत छेडलेल्या आंदोलनाला (CJP Protest) आता अत्यंत हिंसक आणि आक्रमक वळण लागलं आहे.

CJP Protest : NEET पेपरफुटी प्रकरणी केंद्रीय शिक्षणमंत्र्यांनी तात्काळ राजीनामा द्यावा या प्रमुख मागणीसाठी नवी दिल्लीत छेडलेल्या आंदोलनाला (CJP Protest) आता अत्यंत हिंसक आणि आक्रमक वळण लागलं आहे.
‘कॉकरोच जनता पार्टी’ आणि सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या या आंदोलनावर (CJP Protest) पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज करत अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या.
या घटनेनंतर आंदोलकांचा राग अनावर झाला असून दिल्लीतील वातावरण प्रचंड तापले आहे. एकीकडे जंतर-मंतरवर पोलिसांनी आंदोलकांना अडवून धरले असताना, दुसरीकडे संतप्त आंदोलकांनी थेट संसदेच्या (CJP Protest) दिशेने कूच केली आहे. संसदेचे पावसाळी अधिवेशन आजपासून सुरू होत असतानाच, आंदोलनाची ही धग थेट संसद भवनापर्यंत पोहोचली आहे.
वरिष्ठ वकील प्रशांत भूषण यांनी दिलेल्या माहितीनुसार, संसद भवन परिसरात जवळपास ७५ हजार आंदोलक जमा झाले होते. हा मोर्चा संसदेपासून अवघ्या १५० मीटर अंतरावर पोहोचल्याने सुरक्षा यंत्रणांची मोठी धावपळ उडाली.
आंदोलकांना रोखण्यासाठी पोलिसांनी बॅरिकेड्सच्या मोठ्या रांगा उभारल्या आहेत, मात्र अनेक आंदोलक या बॅरिकेड्सवर चढून पुढे जाण्याचा प्रयत्न करत होते. खबरदारीचा उपाय म्हणून संसद परिसरात मोठा पोलिस बंदोबस्त आणि अतिरिक्त फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.
या सर्व घडामोडीं दरम्यान पोलिसांनी धडक कारवाई करत सीजेपीचे नेते अभिजीत दिपके यांना ताब्यात घेतले आहे, तर दुसरीकडे सोनम वांगचुक यांना सरकारने जबरदस्तीने उचलून रुग्णालयात दाखल केल्याचा दावा पक्षाकडून करण्यात आला आहे.
दिल्लीतील या संपूर्ण राजकीय आणि सामाजिक गदारोळावर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी केंद्र सरकार आणि न्यायव्यवस्थेवर खरमरीत शब्दांत टीका केली आहे. नवी दिल्लीतील या आंदोलनाचे संपूर्ण श्रेय सरन्यायाधीश सूर्यकांत यांना जाते, अशा शब्दात टोला लगावत राऊतांनी ‘देशातील मेलेल्यांना जिवंत केल्याबद्दल सरन्यायाधीशांचे आभार’ अशी खोचक प्रतिक्रिया दिली.
सुप्रीम कोर्ट के मुख्य न्यायाधीश
My lord Suryakant ji
आज के महान आंदोलन का श्रेय सिर्फइस एक व्यक्ती को जाता है!
देश के मुर्दो को जिंदा करने के लिये
आभार 🙏🏻 शुक्रिया!@Wangchuk66
@AmitShah pic.twitter.com/e9kygaK8ry— Sanjay Raut (@rautsanjay61) July 20, 2026
दरम्यान, एकीकडे रस्त्यावर आंदोलन आणि तणाव सुरू असताना दुसरीकडे राजकीय पातळीवर संवादाचे प्रयत्नही पाहायला मिळत आहेत. आंदोलक (CJP Protest) प्रतिनिधी सौरव दास आणि आशुतोष रांका यांनी सुमारे दोन तास वाट पाहिल्यानंतर केंद्रीय मंत्री जे. पी. नड्डा यांची भेट घेतली.
या १० मिनिटांच्या भेटीत त्यांनी आपल्या मागण्यांचे निवेदन नड्डा यांच्याकडे सुपूर्द केले. या पत्रावर गांभीर्याने विचार करून पुढे चर्चा करण्याचे आश्वासन जे. पी. नड्डा यांनी दिले आहे. मात्र, या चर्चेच्या प्रक्रियेसोबतच दुसरीकडे दिल्ली पोलिसांकडून मोठ्या प्रमाणावर आंदोलकांची धरपकड सुरूच आहे.






