Nagar | जायकवाडीला नगरचे पाणी जाणार नाही!

नगर (प्रतिनिधी)- मराठवाड्याची तहान भागविणारे जायकवाडी धरण शंभर टक्के भरल्यामुळे यंदा उन्हाळ्यात नगर व नाशिकच्या धरणांमधून पाणी सोडण्याची वेळ येणार नाही.
समन्यायी पाणीवाटप नियमाच्या आधारे 15 ऑक्टोबरपर्यंत जायकवाडी धरणात 65 टक्क्यांपर्यंत भरले पाहिजे. या कालावधीत धरण शंभर टक्क्यांवर असल्यामुळे नगरकरांचे पाणी वाचले आहे.
दरवर्षी पाणी सोडण्यावरून हा वाद उफाळून येतो. गेल्या वर्षी जिल्ह्यात भीषण दुष्काळ असताना, समन्यायी पाणीवाटप नियमाच्या आधारे जिल्ह्यातून पाणी सोडावे लागले.
25 ते 30 नोव्हेंबर 2023 या पाच दिवसांत नाशिक जिल्ह्यातील दारणा व गंगापूर धरणासह नगर जिल्ह्यातील भंडारदरा, निळवंडे व मुळा या धरणामधून आठ टिएमसी पाणी सोडण्यात आले होते. यावरून जिल्ह्यात काही काळ तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती.
पाणी सोडताना जलसंपदा विभागाला काही ठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात करावा लागला. जिल्ह्यातील धरणे कोरडी असताना, जायकवाडीला पाणी सोडण्याची वेळ महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाच्या (मजनिप्रा) अधिनियम 2005 नुसार जिल्ह्यावर आली. मजनिप्रा’च्या कलम क्रमांक 12 (6) (ग) नुसार 2013 पासून मेंढेगिरी समितीच्या अहवालाप्रमाणे पाणीवाटपाचे सूत्र निश्चित झाले.
मात्र यंदा पाणी सोडावे लागणार नसल्याने जलसंपदा विभागासह जिल्हा प्रशासनाने सुटकेचा निःश्वास सोडला आहे. जायकवाडी धरणात सद्यःस्थितीला शंभर टक्के (दोन हजार 909 दशलक्ष घनमीटर) पाणीसाठा आहे.
102 टीएमसी साठवण क्षमता असलेले धरण पूर्ण क्षमतेने भरल्यास दोन वर्षे शेती व चार वर्षे पिण्याच्या पाण्याची चिंता मिटते. ऑक्टोबर 2023 मध्ये या धरणात अवघे 47.04 टक्के साठा होता.




