jayakwadi dam: ‘जायकवाडी’मध्ये पाण्याची आवक वाढली; दोन दिवसांपासून पावसाचा जोर वाढल्याचा परिणाम

पैठण – पैठण धरण क्षेत्रात व गोदावरी नदीच्या वरील जिल्ह्यात झालेल्या जोरदार पावसामुळे मराठवाड्याची तहान भागवणाऱ्या जायकवाडी धरणात देखील पाण्याची आवक वाढली आहे. गत १२ तासांत दीड टक्क्याहुन अधिक पाण्याची आवक धरणात झाली. यामुळे छत्रपती संभाजीनगर व जालना जिल्ह्याची पंधरा दिवस तहान भागेल ऐवढे पाणी धरणात जमा झाले आहे.
मागील काही दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने मराठवाड्यात पाण्याची परिस्थिती गंभीर बनली होती. दरम्यान अशातच गेल्या तीन दिवसांपासून पैठण तालुक्यात व नाशिक, नगर जिल्ह्यात जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे काही ठिकाणी नद्या नाल्यांना पूर आल्याने जायकवाडी धरणांमध्ये देखील पाण्याची वाढ होताना पाहायला मिळत आहे.
अशातच नाशिक जिल्ह्यात झालेल्या जोरदार पावसामुळे जायकवाडी धरणात देखील पाण्याची आवक २७ हजार ५६२ क्युसेकने पाण्याची आवक सुरू आहे. यामुळे जायकवाडीत ३८.१० टक्क्यांवर आला आहे. मागील वर्षी याच दिवशी जायकवाडीमध्ये ३३.६६ टक्के पाणीसाठा होता, असे कार्यकारी अभियंता प्रशांत जाधव, अभियंता विजय काकडे यांनी सांगितले.
नाशिकसह जिल्ह्यात दोन दिवसांपासून पावसाची संततधार पाहायला मिळत आहे. पैठणसह नाशिक जिल्ह्यात शुक्रवारी आणि शनिवारी देखील जोरदार पावसाने हजेरी लावली. विशेष म्हणजे गंगापूर धरण पाणलोट क्षेत्रात देखील मुसळधार पाऊस झाला आहे. यामुळे गंगापूर धरणात पाणीसाठा वाढला असून गंगापूरसह इतर धरणातून पुन्हा पाण्याचा विसर्ग सुरू आहे.
हे पाणी गोदावरी पात्रातून जायकवाडी धरणात येत आहे. त्यातच जायकवाडी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात देखील दोन दिवसांपासून पाऊस पडताना पाहायला मिळत आहे. त्यामुळे जायकवाडी धरणातील पाणीसाठ्यात देखील वाढ होत आहे.





