पेंटेड स्टॉर्क पावसाळ्यात पहिल्यांदाच जायकवाडीवर; नागघाटाच्या पाठीमागे पक्ष्यांची गर्दी

पैठण : जायकवाडी धरणाचा पाणीसाठा सध्या जवळपास भरले आहे. या जलाशयात व गोदावरी नदीच्या नागघाटाच्या पाठीमागे मोठ्या संख्येने पेंटेड स्टॉर्क प्रथमच आढळून आले असल्याची माहिती पक्षी अभ्यासक प्रा.संतोष गव्हाणे यांनी दिली. या पक्ष्याला मराठीत चित्रबलाक असे म्हणतात. जायकवाडी पक्षी अभयारण्यात हिवाळ्यात दिसणारा हा पक्षी आता पावसाळ्यातही मोठ्या प्रमाणावर दिसत आहे.
विशेष म्हणजे पाणी वाढल्यानंतर हे नदीपात्रात व धरणाच्या आतील बाजूलाही मोठ्या प्रमाणावर दिसून आले. चित्रबलाकची चोच पिवळ्या रंगाची, टोकाकडे किंचित बाकदार, मोठी आणि लांब असून याचा चेहरा मेणासारखा पिवळा, त्यावर पिसांचा अभाव, उर्वरित सर्वांगावर पांढरी पिसे आणि त्यावर हिरवट काळ्या खुणा, पंख गुलाबी, छातीवर आडवा काळा पट्टा असतो. चित्रबलाक नर-मादी दिसायला सारखेच असतात.
भारत, पाकिस्तान, श्रीलंका, नेपाळ, बांगलादेश, म्यानमार या देशांमध्ये चित्रबलाक रहिवासी आणि स्थानिक स्थलांतर करणारा पक्षी आहे. इतर पक्षी सध्या परिसरात नाही जायकवाडी पक्षी अभयारण्यात सध्या देशविदेशातील इतर पक्षी आढळून येत नाहीत. मात्र पहिल्यांदाच पावसाळ्यात पेंटेड स्टॉर्क प्रथमच आढळून आला आहे. जायकवाडी धरण व गोदावरीच्या काठावर हे पक्षी जास्त असल्याचे पोलिस निरीक्षक संजय देशमुख यांनी आपल्या कॅमेऱ्यात या पक्ष्याचे फोटो कैद केल्यानंतर सांगितले.





