Jayakwadi Dam : जायकवाडीच्या 18 दरवाजांमधून विसर्ग; आवक पाहून पाण्याचा वेग वाढवणार

Jayakwadi Dam – जायकवाडी धरणात परतीच्या पावसाने पुन्हा १८ दरवाजे उघडण्यात आले असून सोमवारी दुपारी १८ दरवाजांमधून दोन फूट उंचावून ३७७२८ क्युसेक गोदावरी नदीच्या पात्रात पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे.
आवक २८२९६ क्युसेक येत असल्याने धरणाच्या पायथ्याशी असलेला पिंपळेश्वर पूल पाण्याखाली गेला असून याच पुलावरून धोकादायक स्थितीत जड वाहतूक सुरू असून पर्यटक सेल्फी घेण्यासाठी प्रचंड गर्दी करत आहेत.
मंगळवारी १८ दरवाजे दोन फूट उंचावून नदीच्या पात्रात पाणी सोडले जात आहे. यामुळे धरणाच्या पायथ्याशी असलेला पूल पाण्याखाली गेला असताना या पुलावरून जड वाहने ये-जा करतायेत तर अनेक युवक, महिला सेल्फी घेताना दिसल्या.
या ठिकाणी पाणी वाढल्याने कुणी पुलावरून जाऊ नये, असे आवाहन पोलिस निरीक्षक संजय देशमुख यांनी केले आहे. सोमवारी दुपारी जायकवाडीत आवक वाढल्याने गेट क्र. १० ते २७ असे एकूण १८ दरवाजे २ फूट उंचीवर ३७७२८ क्युसेक विसर्ग नदीच्या पात्रात सुरू करण्यात आल्याचे कार्यकारी अभियंता प्रशांत जाधव, अभियंता विजय काकडे यांनी दिली.
परतीचा पाऊस असाच सुरू राहिला व आवक बघुन पाण्याचा वेग वाढवण्यात येईल. कुणी नदीच्या पात्रात जाऊ नये, असे आवाहन कार्यकारी अभियंता प्रशांत जाधव यांनी केले आहे.





