नगर | कोल्हार – घोटी राज्यमार्ग गेला खड्ड्यात !

संगमनेर – शहरात येणाऱ्या चारही बाजूच्या रस्त्यांना चौपदरीकरण करून विकासाचे नवे मॉडेल उभे राहिले. कोल्हार – घोटी या राज्यमार्गावर असणाऱ्या समनापूर ते पंचायत समिती रस्त्याचे काम गेल्या सहा महिन्यांपूर्वी पूर्ण झाले. मात्र, पहिल्याच पावसात या रस्त्याची अक्षरशः चाळण झाली असून, मोठमोठ्या खड्ड्यांमध्ये रोज अपघातांची मालिका सुरू असल्याने संबंधित ठेकेदाराला काळ्या यादीत टाकण्याची मागणी होत आहे.
संगमनेर शहरासह शहराला जोडल्या जाणाऱ्या रस्त्यांची समस्या बिकट झाली आहे. अनेक रस्त्यांना मोठमोठे खड्डे पडले असून त्यात पावसाचे पाणी साचल्याने वाहन चालवताना मोठी तारांबळ उडते. कोल्हार-घोटी राज्यमार्गावरील समनापूर ते संगमनेर पंचायत समितीपर्यंत झालेल्या रस्त्यात गुडघ्या एवढे खड्डे झाल्याने या मार्गावर रोजच दुचाकीस्वार पडून जखमी होत आहेत. एखाद्या मोठ्या अपघाताची शक्यताही नाकारता येत नाही.
शुक्रवारी (दि.23) सुरू असलेल्या पावसामुळे याच रस्त्याला तलावाचे स्वरूप प्राप्त झाले आहे. रात्री कमीत कमी दहा ते बारा दुचाकीस्वारांचे मोबाईल पाण्यात पडले तर अनेक जण जखमी झालेले आहेत. संबंधित ठेकेदाराने गेल्या सहा महिन्यांपूर्वी हा रस्ता बनवला आहे. पहिल्याच पावसात त्याची अशी दुर्दशा झाल्याने प्रवाशी संताप व्यक्त करत आहेत.
ठेकेदाराच्या भोंगळ कारभाराचा फटका नागरिकांना सोसावा लागत आहे. परिसरातील अनेक रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. खड्ड्याचा अंदाज येत नसल्याने दिवसेंदिवस अपघातांमध्ये वाढ होण्याचे प्रमाण वाढले आहे. समनापूर ते संगमनेरपर्यंत साईड गटार होणे खूप गरजेचे आहे. तसेच खड्डे बुजवून रस्त्याचे नूतनीकरण त्वरित करावे, अशी मागणी नागरिकांसह वाहनचालकांकडून केली जात आहे.
रस्ता निष्कृष्ट दर्जाचा
समनापूर ते पंचायत समितीपर्यंतच्या रस्त्यावर साईड गटारी नाहीत. साईडपट्ट्या नाहीत. त्यामुळे पावसाचे पाणी रस्त्यावर साचून त्या ठिकाणी मोठमोठे खड्डे तयार झाले आहेत. काही महिन्यांपूर्वीच झालेल्या या रस्त्यावर खड्डे कसे पडू शकतात, याचा अर्थ संबंधित ठेकेदाराने हा रस्ता निष्कृष्ट दर्जाचा बनवला आहे. तसेच राजापूर रस्त्यावर पावसात सिमेंट काँक्रीटीकरण करणाऱ्या ठेकेदारांना काळ्या यादीत समाविष्ट करण्याची मागणी वाहनचालक करत असून पालकमंत्री याकडे कितपत लक्ष घालणार, याकडे संगमनेरकरांचे लक्ष लागून आहे.





