नगर | काँग्रेसचे आमदार लहू कानडे यांना उमेदवारी नाकारली

श्रीरामपूर – काँग्रेसने आज (ता.२६) दिल्लीतून जाहीर केलेल्या २३ उमेदवारांच्या यादीमध्ये श्रीरामपूर विधानसभा मतदार संघातून जिल्हा बँकेचे संचालक करण ससाणे यांचे समर्थक प्रदेश सरचिटणीस हेमंत ओगले यांना काँग्रेसची उमदेवारी जाहीर करण्यात आली आहे. विद्यमान आमदार लहू कानडे यांना काँग्रेसने डच्चू दिला आहे.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर श्रीरामपूर तालुक्यात काँग्रेसअंतर्गत रस्सीखेच सुरू होती. इच्छुकांसह कार्यकर्त्यांमध्ये कमालीची धाकधूक होती. दोन दिवसांपूर्वी जाहीर झालेल्या यादीतही अनेक विद्यमान आमदारांची वर्णी लागलेली नसल्याने तर्कवितर्कांना उधाण आले होते. श्रीरामपूरचा विचार केला तर आमदार लहू कानडे यांची उमेदवारी निश्चित मानली जात होती.
तसे संकेत जिल्ह्याचे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी श्रीरामपूर येथे नुकत्याच झालेल्या जाहीर कार्यक्रमातून दिले होते. परंतु, आज जाहीर झालेल्या उमेदवारांच्या यादीमुळे आमदार कानडे समर्थक कार्यकर्त्यांच्या पदरी निराशाच पडली. दुसऱ्या बाजूला जिल्हा बँकेचे संचालक करण ससाणे यांनी दुसरे इच्छुक हेमंत ओगले यांच्या माध्यमातून उमेदवारी मिळविण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू ठेवलेले होते. ओगले यांनी ही उमेदवारी मिळवून देणे हा मुद्दा ससाणे यांच्यासाठी प्रतिष्ठेचा झाला होता. त्यात त्यांना पत्नी दिपाली यांचीही मोठी साथ लाभली. ओगले यांचे मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंग यांच्याशी असलेले संबंध कामी आले. थोरातांचे मतपरिवर्तन करण्यासाठी सर्वच बाजून सुरू असलेल्या प्रयत्नांना यामुळे यश आले.
पक्षाने केलेल्या अन्यायाविरुद्ध जनताच न्याय करेल – आ. कानडे
काँग्रेस पक्षात प्रवेश केल्यापासून अत्यंत प्रामाणिकपणे पक्ष नेतृत्वाशी व पक्षाच्या विचाराशी एकनिष्ठ राहिलो. मायबाप मतदारांनी लोकप्रतिनिधी म्हणून काम करण्याची दिलेली संधी जबाबदारी समजून भेदभाव न करता सर्वांची कामे केली. जमाखर्चही मायबाप जनतेसमोर लेखी स्वरूपात कार्य अहवाल प्रसिद्ध करून सादर केला. घराणेशाहीच्या ताब्यातून पक्ष संघटना मुक्त करून तळागाळापर्यंत उत्तम संघटना बांधली. जनतेमध्ये आमदार लहू कानडे यांनाच पुन्हा संधी देण्याची भावना असताना पक्षाच्या दिल्लीस्थित नेत्यांनी एका पक्षनिष्ठ व प्रामाणिक कार्यकर्त्याचा विश्वासघात केला. विधानमंडळात मागील २० वर्षे बंद पडलेला श्रीरामपूरचा आवाज जनतेचे प्रश्न मांडून पुन्हा बुलंद केला. त्यामुळे पुन्हा मायबाप मतदारांच्या न्यायालयात माझ्यावर पक्षाने केलेल्या अन्यायाच्या विरोधात सोमवार दि. 28 रोजी उमेदवारी अर्ज भरून न्याय मागणार आहे. पक्षाने केलेल्या अन्यायाविरुद्ध जनताच न्याय करेल, अशी प्रतिक्रिया आमदार लहू कानडे यांनी दिली.
पक्षाशी एकनिष्ठ राहिल्याचे फळ मिळाले
गेली १७ वर्षांपासून काँग्रेस पक्षाशी एकनिष्ठ राहिल्याचे फळ उमेदवारीच्या रुपाने मिळाले आहे. गोरगरीब कुटुंबातील युवक काँग्रेसच्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला माझ्या रुपाने संधी दिली, त्याबद्दल मी पक्षाचे आभार मानतो. विशेष म्हणजे तालुक्यातील स्व. जयंतराव ससाणे यांच्या संघटनेच्या माध्यमातून ही उमेदवारी खेचून आणण्यात आम्हाला यश मिळाले. ह्या संघटनेशी गेल्या २५ वर्षांपासून जो बांधील राहिला तो काँग्रेसचा उमेदवार आमदार म्हणून निवडून आला असल्याचा आजवरचा इतिहास आहेत. त्यामुळे आपणही शंभर टक्के विजयी होऊ अशी ग्वाही देतो, अशी प्रतिक्रिया हेमंत ओगले यांनी उमेदवारी जाहीर झाल्यानंतर दिली.





