महसूल सप्ताह कार्यक्रमाकडे नागरिकांची पाठ; भाजपाचे नेते सुरेश थोरातांनी व्यक्त केली नाराजी

संभाजी गोरडे
रांजणगाव : राज्य शासनाच्या वतीने सुरू झालेल्या ‘महसूल सप्ताहा’चा रांजणगाव गणपती येथे पुन्हा फज्जा उडाला आहे. या ठिकाणी काही नागरिक उपस्थित होते, तर प्रशासनातील काही अधिकारी व कर्मचारी मात्र दिसून आले. मात्र, वन विभाग व भूमी अभिलेख विभागाचे व महावितरणचे अधिकारी अनुपस्थित होते.
महसूल विभागामार्फत आयोजित महसूल सप्ताह २०२५ अंतर्गत रांजणगाव गणपती मंडळ विभागामध्ये शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. मात्र शिबिराला अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. प्रशासनाच्या बोटांवर मोजण्याइतकेच नागरिक व ग्रामस्थ उपस्थित होते.
ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला रांजणगाव येथे या महसूल सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी तर चक्क कार्यक्रम सुरू झाल्यावर 11:00 वाजता नागरिकांना ग्रामसुरक्षा यंत्राद्वारे माहिती देण्यात आली. आजच्या कार्यक्रमाची ही नागरिकांना व्यवस्थित अशी माहिती उपलब्ध नसल्याने या ठिकाणी गर्दी होऊ शकली नाही.
तर जे नागरिक या ठिकाणी आले मात्र संबंधित विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित नसल्याने काही नागरिकांना बिन कामाचा हेलपाटा झाला, त्यामुळे या शिबिराबद्दल नाराजी व्यक्त केली. याबाबत भाजपाचे ज्येष्ठ नेते सुरेश थोरात यांनीही अधिकारी व कर्मचारी जर या ठिकाणी उपस्थित नसतील तर अशा शिबिरांचा काय उपयोग? असा सवाल उपलब्ध केला आहे.





