Pune | नागरिकांचा समस्यांसह पीएमपीतून प्रवास

पुणे : पीएमपी बसवरील डिजिटल फलकांची तपासणी करून खराब झालेले फलक सुरू करण्याच्या सूचना देऊनही आजही बहुतांश बसवरील डिजिटल फलक बंदच आहेत. काही बसचे पुढचे फलक सुरू आहेत; पण मागचे आणि बाजूचे फलक बंद आहेत. बसमधील प्रथमोपचार पेटी तुटलेली, अलर्ट बटन काम करेना, बसमधील सीट खिळखिळ्या आणि अस्वच्छता अशा अनेक समस्यांमध्ये प्रवाशांना प्रवास करावा लागत आहे.
पुणे, पिंपरी- चिंचवड आणि पीएमआरडीएच्या हद्दीत सध्या १ हजार ७०० बसच्या माध्यमातून सेवा दिली जाते. पीएमपीच्या बस मार्गावर धावत असताना बऱ्याच वेळा बसवरील मार्ग क्रमांक, मार्गाचे नाव व्यवस्थित दिसत नाहीत. अनेक बसचे डिजिटल बोर्ड खराब झाल्यामुळे प्रवाशांना मार्गाची व्यवस्थित माहिती मिळत नसल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. डिजिटल बोर्ड व्यवस्थित न दिसल्याने बस निघून जाते आणि प्रवाशांना पुन्हा पुढच्या बसची वाट पाहात ताटकळावे लागते.
त्यामुळे जून महिन्यात पीएमपीने या सर्व तक्रारींची दखल घेत स्वमालकीच्या ४०० बसच्या डिजिटल फलकांची तपासणी करून खराब झालेले फलक बदण्याचा निर्णय घेतला. मात्र, त्याची कार्यवाही कितपत झाली, हे एक कोडेच आहे. कारण, आजही संचलनातील बहुतांश बसचे डिजिटल फलक हे बंदच आहेत. एवढेच काय तर भाडेतत्त्वावरील बसचे डिजिटल फलकही बंद असल्याचे दिसून येत आहे.
प्रशासन लक्ष देईल का?
कर्वे रस्त्यावरील मार्केट यार्ड बसमधील डिजिटल बोर्ड बंद, तेथील प्रथोमपचार पेटी मोकळीच असल्याचे, प्रवाशांनी सांगितले. काही बसमध्ये तर डिजिटल फलक बंद असल्यामुळे पाट्या लावल्या जातात. मात्र, या पाट्या लांबून दिसत नाहीत. आणि बस स्टाॅपवर बस थांबून त्या वाचेपर्यंत बस निघून गेलेली असते, अशी व्यथा ज्येष्ठ प्रवाशांनी व्यक्त केली. किमान बोर्ड दिसेल अशा ठिकाणी लावावा, तसेच बंद पडलेले डिजिटल फलक तात्काळ सुरू व्हावे. प्रथमोपचार पेट्या सुसज्ज असाव्या, अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे.





