पिंपरी | अनियमित वीजपुरवठ्यामुळे नागरिकांचे हाल

आंदर मावळ, (वार्ताहर) – आंदर मावळ विभागातील नागरिकांच्या वीज पुरवठ्याबाबत असलेल्या तक्रारींचा आमदार सुनिल शेळके यांनी नुकताच आढावा घेतला. मागील अनेक दिवसांपासून याठिकाणच्या नागरिकांकडून अनियमित वीज पुरवठ्याबाबत सातत्याने तक्रारी होत आहेत. या पार्श्वभूमीवर आमदार सुनिल शेळके यांनी राजगुरुनगर विभागाचे कार्यकारी अभियंता राजेंद्र येडके, वडगाव उपविभागाचे उपकार्यकारी अभियंता शैलेश गीते यांसह परिस्थितीचा आढावा घेतला.
आंदर मावळ भागात अनियमित वीज पुरवठ्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. वेळीअवेळी वीज गायब होत असल्याने विद्यार्थी, कामगार, सामान्य नागरिक यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. याबाबत स्थानिकांनी अनेकदा विभागीय कार्यालयात तक्रारी केल्या. परंतु त्यांच्या समस्यांचे तक्रार निवारण होऊ शकले नाही, अशी तक्रार नागरिकांनी आमदारांकडे केली.
शेतकऱ्यांना आर्थिक फटका –
विजेच्या समस्यांमुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. शेतकऱ्यांना देखील आर्थिक फटका बसत आहे. वीज कंपन्यांची देखभाली बाबतची अनास्था यामुळे पावसाळ्यात विद्युत अपघातांचे प्रमाण देखील वाढते. प्रत्येक गावनिहाय पाहणी केल्याने या समस्यांवर काय उपाययोजना करता येतील, याची माहिती यावेळी घेण्यात आली.
अधिक क्षमतेचे नवीन ट्रान्सफॉर्मर बसविणे, विद्युत खांब बसविणे, कर्मचारी संख्या वाढविणे यासारख्या उपाययोजना तातडीने करण्याचे आश्वासन उपस्थित अधिकाऱ्यांनी दिले आहे. ही कामे पूर्ण झाल्यावर वीज पुरवठा खंडित होण्याचे प्रमाण देखील कमी होईल आणि या भागातील विजेसारख्या पायाभूत समस्येचे संकट नक्कीच दूर केले जाईल. – आमदार सुनिल शेळके





