पुणे जिल्हा | नागरिकांनी पक्षांना दाणा पाणी ठेवावा

तळेगाव ढमढेरे, (वार्ताहर)- सध्या उन्हाची तीव्रता वाढत असल्याने नागरिकांना उष्णतेचा सामना करावा लागत असताना कित्येक ठिकाणी पक्षांचे पाण्याअभावी हाल होत असल्याचे दिसत आहे, त्यामुळे पक्षांचे बळी रोखण्यासाठी नागरिकांनी सध्या पक्षांना दाणा पाणी ठेवण्याचे आवाहन निसर्ग वन्यजीव सामाजिक संस्थेचे उपाध्यक्ष सूरज वाघमारे, सचिव अमर गोडांबे यांसह प्राणीमित्रांनी केले आहे.
सध्या उन्हाची तीव्रता मोठ्या प्रमाणात वाढत असताना तापमान देखील उच्चांक गाठू लागले आहेत. कित्येक ठिकाणी नदी, ओढे कोरडे पडल्याने विहिरी तळ गाठू लागल्याने शेतकऱ्यांची पिके धोक्यात आलेली आहेत.
शेतामध्ये पाणी नसल्याने असंख्य पक्षी पाण्याच्या शोधात मनुष्यवस्ती तसेच घरांकडे धाव घेत आहेत, परंतु सध्याच्या उन्हाच्या तीव्रतेमुळे काही पक्षांचा पाण्या अभावी मृत्यू होण्याची चिन्हे निर्माण होत आहेत. काही ठिकाणी उष्माघाताच्या संकटात सापडलेले पक्षी आढळू लागले आहेत.
पक्षी टिकले तरच निसर्ग टिकणार
सध्या अनेक ठिकाणी नागरिक जागरूक झालेले असल्याने पक्षांना पाण्याची व्यवस्था करत आहेत. मात्र, निसर्ग राखण्यासाठी पक्षांची मोठी गरज आहे. पक्षी टिकले तरच निसर्ग टिकणार असल्याने पक्षांच्या संवर्धनासाठी नागरिकांचा सहभाग महत्वाचा आहे, सध्या नागरिकांनी शक्य तेथे पक्षांसाठी पाण्याची व्यवस्था करत मुठभर धान्य पक्षांना टाकणे गरजेचे आहे.
काही दिवस नागरिकांनी आपल्या घरासमोर तसेच घराच्या छतावर पाणी ठेवावे, असे आवाहन देखील निसर्ग वन्यजीव सामाजिक संस्थेचे उपाध्यक्ष सूरज वाघमारे, सचिव अमर गोडांबे, सर्पमित्र अभिजित वाघमारे, शुभम वाघ यांसह आदी सर्पमित्रांनी केले आहे.





