लॉकडाऊन शिथिल झाल्याने कोथरूड परिसरातील नागरिक रस्त्यावर

कोथरुड, कर्वेनगर, वारजे परिसरातील परिस्थिती
कोथरुड (प्रतिनिधी) – शहरातील काही भागातील लॉकडाऊन शिथिल करण्यात आल्यानंतर कोथरुड, कर्वेनगर तसेच वारजे भागात नागरिक घराबाहेर पडत असल्याचे चित्र पाहिला मिळाले तर रस्त्यांवर काही प्रमाणात गर्दी दिसून आली. पोलिस प्रशासनाने वेळीच हटकल्यानंतर मात्र नागरिकांनी घरचा रस्ता धरला.
वाईन शॉप सुरू करण्यास परवानगी मिळाल्याने आज सकाळ पासूनच वाईन शॉप समोर सोशल डिस्टन्सचे नियम झुगारत गर्दी झाली होती मात्र पोलिस प्रशासनाने हस्तक्षेप केल्याने व शॉप चालकास तंबी दिल्याने गर्दी पांगली. कोरोनाचे संकटातून आपण बाहेर पडलो आहोत असा समज करतच नागरिक बाहेर पडू लागल्याने कोरोनाचा संसर्ग आणखीच वाढण्याचा धोका निर्माण झाला आहे. पोलिसांनी सिल केलेले रस्ते अजून तसेच असताना नागरिक चालत येऊन जवळच्या चौकात नेहमीच्या कट्ट्यावर जमले होते. यामुळे पोलिस व आरोग्य खात्याची डोकेदुखी वाढण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.
कोथरुड मधील पौड फाटा चौक, कर्वेनगरचा मुख्य चौक, वारजे हायवे चौक येथे तुरळक गर्दी झाली होती. लॉक डाऊन चे नियम जरी शिथिल केले असले तरी कोरोनाचे संकट टळलेले नाही हे लक्षात घेऊन नागरिकांनी नियमांचे पालन करतच गरज असेल तरच घराबाहेर पडले पाहिजे असे मत जाणकारांकडून व्यक्त केले जात आहे.





