पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – बदलापूर येथील पाशवी घटनेनंतर राज्याचा शालेय शिक्षण विभाग ताळ्यावर आला आहे. आता शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी उपाययोजना लागू केल्या आहेत. यात प्रामुख्याने शाळा व परिसरात सीसीटीव्ही बसविणे बंधनकारक करण्यात आले आहे. शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या अनुषंगाने काही अनुचित घटना घडल्या आहेत. त्यामुळे त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. शालेय विद्यार्थ्यांच्या विशेषतः मुलींच्या सुरक्षिततेसाठी उपाययोजनासंदर्भात शासनस्तरावरून वेळोवेळी आदेश काढण्यात आले होते. विद्यार्थ्यांची सुरक्षा सर्वतोपरी असल्याने, या उपाययोजनांशी तडजोड करता येणार नाही. या बाबतचे आदेश अवर सचिव प्रमोद पाटील यांनी जारी केले आहेत. सर्व खासगी शाळांनी एका महिन्यात शाळा व परिसरातील मोक्याच्या ठिकाणी सीसीटीव्ही बसविणे बंधनकारक आहे. अन्यथा संबंधित शाळांचे अनुदान रोखणे अथवा शाळेची मान्यता रद्द करण्याच्या कारवाईचा अवलंब करण्यात येणार आहे. शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांनी प्राधान्याने कॅमेरे बसविण्याबाबत कार्यवाही करावी. शिक्षकेतर कर्मचारी नियुक्तीपूर्वी चारित्र्य पडताळणी शाळेतील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची नियुक्ती करताना काळजी घ्यावी लागणार असून कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या वर्तनावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. सुरक्षारक्षक, सफाईगार, मदतनीस, स्कूल बसचे चालक आदी बाबतीत संबंधित व्यक्तीच्या पार्श्वभूमीची काटेकोर तपासणी शाळा व्यवस्थापनामार्फत होणे आवश्यक आहे. यासाठी नेमणुकीपूर्वी चारित्र्य पडताळणी अहवाल स्थानिक पोलीस यंत्रणेमार्फत प्राप्त करून घेणे आवश्यक राहील. नेमणुकीनंतर संबंधित व्यक्तीच्या छायाचित्रासह त्याची सर्व तपशीलवार माहिती स्थानिक पोलीस यंत्रणेकडे द्यावी लागणार आहे. घटना दडविल्यास कारवाई शाळेमध्ये विद्यार्थ्यासोबत अनुचित प्रकार घडल्याचे उघड झाल्यानंतर संबंधित शाळा व्यवस्थापन, संस्था, मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी सदर बाब चोवीस तासाच्या आत संबंधित शिक्षणाधिकारी यांना कळवावी. अशी अनुचित घटना कोणत्याही प्रकारे दडवून ठेवण्याचा प्रयत्न झाल्याचे निर्दशनास आल्यास, संबंधित व्यक्ती, संस्था यांच्यावर कारवाई होणार आहे. – शाळांमध्ये तक्रार पेटी बसविण्याचे बंधन – सखी सावित्री समिती स्थापन होणार – कर्तव्यात कसून केल्यास मुख्याध्यापकावर शिस्तभंगाची कारवाई – महिला कर्मचारी यांच्या नियुक्तीला प्राधान्य – सीसीटीव्ही फुटेज आठवड्यातून तीन वेळा तपासावे लागेल