पुणे जिल्हा | जयतपाड परिसरातील नागरिकांची अंधारातून सुटका

भाटघर, (वार्ताहर) – भाटघर धरणाच्या दक्षिण बाजूकडील जयतपाड (ता. भोर) परिसरात गेल्या पंधरा दिवसांपासून वीज रोहित्रमध्ये बिघाड झाल्याने हा परिसर अंधारात होता. याबाबत भाजपा तालुका उपाध्यक्ष समीर घोडेकर व भाजप युवा वाॅरिअर्सचे अध्यक्ष रोहन भोसले यांनी पाठपुरावा केला होता.
या प्रकरणाची दखल घेत दैनिक प्रभातमधून वृत्त प्रसिद्ध केले होते. या वृत्ताची त्वरित दखल घेऊन महावितरणने जयतपाड येथील विद्युत रोहित्राची दुरुस्ती केली. तर, या परिसरातील जळकेवाडी येथे नवीन वीज रोहित्र बसवले आहे. वीज पुरवठा सुरळीत झाल्याने परिसरातील गावांची अंधारातून सुटका झाली आहे.
गेल्या १५ दिवसांपासून भाटघर परीसरात मुसळधार पाउस पडत होता. यामुळे वेळवंड खोऱ्यातील बसरापूर, बारे, कर्नवडी, म्हाळवडी, पसुरे, राजघर, जयतपाड, पांगारी, डेहेण, नानावळे, वेळवंड, शिंदेवाडी, बुरुडमाळ, कोंडगाव, हुंबेवस्ती, सोनारवाडी, सांगवी, साळूंगण, जळकेवाडी, झानेरे या गावातील नागरिकांना गेल्या काही दिवसांपासून नियमीत व सुरळीत वीज पुरवठा होत नसल्याने मोठी गैरसोय होत होती.
विजेचा पुरवठा होत नसल्याने रात्रीच्या वेळी काळाकुट्ट अंधारात राहावे लागत होते. नळाचे पाणी, मोबाईल चार्जिंग, दळण, महिलांची विजेवरील ही घरगुती कामे करताना गैरसोय होत होती.
गेल्या १५ दिवसांपासून जयतपाड व जळकेवाडी येथील विद्युत रोहित्र नादुरुस्त झाल्याने वीज खंडित झाली होती. वीजपुरवठा खंडित झाल्याने नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत होते.
महावितरणचे उपकार्यकारी अभियंता अरविंद अंभोरे यांच्याकडे जयतपाड परिसरातील वीजपुरवठा सुरळीत व्हावा, यासाठी घोडेकर तसेच भोसले यांनी मागणी व पाठपुरावा केला होता. महावितरणने जयतपाड येथे विद्युत वीज रोहित्राची दुरुस्ती केली असुन जळकेवाडीत नवीन वीज रोहित्र बसवले आहे. यामुळे परिसरातील नागरिकांची अंधारातून सुटका झाली आहे.





