भाटघर धरणाच्या पाण्याला हिरवा रंग; नागरिकांत भीती, प्रशासन सतर्क

नसरापूर – भोर तालुक्यातील भाटघर (येसाजी कंक) धरणाच्या बॅकवॉटरमधील पाण्याला अचानक हिरवा रंग आल्याने संगमनेर, माळवाडी आणि नन्हे गावांमध्ये खळबळ उडाली आहे. या रंग बदलामुळे पिण्याच्या पाण्याची सुरक्षितता, शेतीसाठी पाण्याचा वापर आणि नागरिकांचे आरोग्य धोक्यात येण्याची भीती स्थानिकांनी व्यक्त केली आहे. परिसरात चिंतेचे वातावरण पसरले आहे.
भाटघर धरण शाखा अभियंता गणेश टंगल यांनी सांगितले की, मत्स्य विभागाने धरणात बसवलेल्या पिंजऱ्यांमधील खाद्यपदार्थांतील नायट्रोजनमुळे शेवाळ वाढून पाण्याला हिरवा रंग येतो. ही स्थिती काही दिवसांत सामान्य होईल, असे त्यांनी स्पष्ट केले. तथापि, नागरिकांनी या बदलाचे शास्त्रीय कारण आणि पाण्याच्या सुरक्षिततेबाबत स्पष्टता मागितली आहे.
उपविभागीय अधिकारी डॉ. विकास खरात यांनी घटनेची गंभीर दखल घेत पाण्याचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्याचे आदेश दिले आहेत. तसेच, पाण्यातील तवंग कमी करण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचना संबंधित विभागाला दिल्या आहेत. स्थानिकांनी प्रशासनाने पारदर्शक आणि त्वरित कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. पाण्याच्या गुणवत्तेवर परिणाम होऊ नये म्हणून प्रशासन सतर्क झाले आहे.





