क्रशसँडची होणारी गळती व ओव्हरलोड विरोधात भावडी रोड येथे नागरिकांनी केले रास्ता रोको आंदोलन; पोलिसांना दिले निवेदन

वाघोल (प्रतिनिधी) : वाघोली व भावडी येथील खाणींमधून खडी व क्रशसँडची वाहतूक करणाऱ्या डंपरमधून होणारी गळती तसेच ओव्हरलोडमुळे वाघोली-भावडी रस्त्याच्या झालेल्या दुरवस्थेविरोधात वाघोलीतील नागरिक व परिसरातील सोसायटी धारकांनी भावडी रोड भैरवनाथ तलाव येथे रास्ता रोको आंदोलन केले.
पोलिसांन याबाबत कारवाईचे निवेदन देण्यात आले असून उपाययोजना करण्यात आल्या नाही तर पुन्हा आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला आहे.
वाघोली व भावडी या दोन गावांमध्ये मोठ्या प्रमाणात खाण व स्टोन क्रेशर असल्याने त्याची वाहतूक भावडी ते वाघोली या रस्त्याने होत असते. वाहतूक करत असताना चालक व मालक कसल्याही प्रकारचे नियमांचे पालन करून वाहतूक करीत नाहीत. रोज हजारो डंपर या रस्त्याने येत जात असतात.
डंपर मधून सांडणाऱ्या मालामुळे सर्व रस्त्यावर धूळ निर्माण झाल्याने संपूर्ण रस्त्यावर धूळ उडत असते. डंपर ओव्हरलोड वाहतूक करीत असल्याने सिमेंटचा बनवण्यात आलेला रस्ता पूर्णपणे खराब होऊन मोठ मोठे खड्डे पडले आहेत.
ओव्हरलोड वाहतुकीमुळे गाड्यांना ब्रेक लागत नसल्याने अपघाताचे प्रमाण सुद्धा वाढले आहे. याकडे संबंधित विभागाचे किंवा प्रशासनाचे दुर्लक्ष झालेले आहे. रस्त्यावर उडणाऱ्या प्रचंड धुळीमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
विशेष म्हणजे लहान मुले व महिला यांना हृदयविकार व फुफ्फुसाचे विकार, दमा, डोळ्यांचे आजार, त्वचेचे आजार यांना सामोरे जावे लागत आहे. धुळीबाबत वाघेश्वर क्रशर संघटना यांना वारंवार सांगून सुद्धा काही उपाययोजना केल्या नसल्यामुळे स्थानिक रहिवाशांनी रास्ता रोको आंदोलन केले.





