Traffic in Dehu : देहूतील वाहतूक कोंडीने नागरिक हैराण
Traffic in Dehu : बेकायदा पार्किंग, बाजार व्यवस्थापनावर प्रश्नचिन्ह

देहूगाव – शहरातील वाहतूक व्यवस्थेचा बोजवारा उडाल्याने नागरिक, भाविक आणि वाहनचालक त्रस्त झाले आहेत. मंगळवार आणि शुक्रवारी भरणाऱ्या साप्ताहिक बाजाराच्या दिवशी मुख्य कमान, देहू-आळंदी मार्ग, तळवडे शिव परिसर, माळवाडी आणि १४ टाळकरी मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. त्यामुळे वाहनचालकांना तासन्तास अडकून पडावे लागत आहे.
रस्त्यांच्या दुतर्फा उभी केली जाणारी वाहने, बेकायदा पार्किंग आणि रस्त्यावरच भरणारा बाजार यामुळे वाहतुकीचा खोळंबा होत आहे. रुग्णवाहिका, शालेय बस आणि अत्यावश्यक सेवांच्या वाहनांनाही मार्ग काढणे कठीण होत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
दर आठवड्याला हीच परिस्थिती निर्माण होत असतानाही प्रशासनाकडून प्रभावी उपाययोजना होत नसल्याची नाराजी व्यक्त केली जात आहे. बाजारातून महसूल वसूल केला जातो, मात्र बाजार व्यवस्थापन आणि वाहतूक नियंत्रणाकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
स्थानिक लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाकडून बेकायदा बाजाराला अभय दिले जात असल्याचाही संशय नागरिकांनी व्यक्त केला आहे. वाहतूक पोलीस, नगरपंचायत, नियंत्रण कक्ष आणि देहूरोड वाहतूक शाखेकडे वारंवार तक्रारी करूनही ठोस कारवाई होत नसल्याचा आरोप करण्यात आला आहे.
संत तुकाराम महाराजांच्या पावन भूमीत देश-विदेशातून भाविक येत असताना वाहतूक व्यवस्थेतील हा गोंधळ देहूच्या प्रतिमेला धक्का देणारा ठरत असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली. या गंभीर प्रश्नाकडे प्रशासनाने तातडीने लक्ष घालावे, बेकायदा बाजार, अतिक्रमणे आणि अनधिकृत पार्किंगवर कठोर कारवाई करावी, अन्यथा तीव्र जनआंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा नागरिकांनी दिला आहे.
स्वतंत्र बाजारपेठ आणि पार्किंगची गरज
देहूमधील साप्ताहिक बाजार गावठाणाबाहेरील शासकीय गायरान किंवा अन्य मोकळ्या जागेत स्थलांतरित करावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. तेथे स्वतंत्र पार्किंगची व्यवस्था केल्यास गावातील वाहतूक कोंडी कमी होईल.
रुग्णवाहिका, अग्निशमन दल आणि अन्य अत्यावश्यक सेवांच्या वाहनांना विनाअडथळा मार्ग मिळेल. तसेच भाविक, स्थानिक नागरिक, व्यावसायिक आणि रिक्षाचालकांनाही सुरक्षित वाहतुकीचा लाभ मिळेल, अशी भावना नैगरिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे.





