जेजुरी परिसरातील वाढत्या चोऱ्यांमुळे नागरिक त्रस्त

पुणे – जेजुरी परिसरामध्ये गेल्या एक ते दीड महिन्याच्या काळात घरफोडी, चोरीच्या घटना वाढल्याने या परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. यात जिल्हा पोलीस अधीक्षकांनी लक्ष घालून चोरांचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे.
गेल्या आठवड्यात जवळार्जुन गावात एकाच रात्री घरफोडीच्या दोन घटना घडल्या. या चोरीच्या घटनेत चोरट्यांनी सहा ते सात लाख रुपये किमतीचे दागिने लंपास केले. आयुष्भर जमा केलेली पुंजी एका रात्रीत चोरल्याने चोरी झालेल्या टेकवडे कुटुंब खचून गेले आहे.
हे दरोडेखोर अतिशय सराईत असून घरफोडी करताना सदर ठिकाणी राहणाऱ्या नागरिकांच्या चेहऱ्यावर बेशुद्ध करणाऱ्या स्प्रेचा वापर करीत असल्याची नागरिकांमध्ये चर्चा आहे. अशाप्रकारे चोरीच्या पाच ते सहा घटना घडून देखील जेजुरी पोलिसांना अद्यापपर्यंत दरोडेखोरांचा शोध लागलेला नाही. त्यामुळे जिल्हा पोलीस अधीक्षकांनी लक्ष घालून जेजुरी पोलीस स्टेशन हद्दीमधील वाढत्या गुन्ह्यांना आवर घालण्यासाठी व दरोडेखोरांचा शोध लावण्यासाठी प्रयत्न करावे, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
जेजुरी परिसरातील नागरिकांच्या मोबाईलवर एक व्हिडिओ व्हायरल होत असून यामध्ये एक जॅकेट घालून कंबरेला तलवार लावून दरोडेखोर चोरी करताना दिसत आहे. या सर्व प्रकारामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून स्वतःच्या शेताकडे जाणाऱ्या शेतकऱ्यांनाही भीती वाटत आहे. या घडलेल्या चोऱ्यांच्या घटनांचा शोध घेवून मुद्देमाल हस्तगत करण्याचे आव्हान ग्रामीण पोलिसांपुढे असून गुन्हेगारांना जेरबंद करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
आमदार धंगेकर यांचा पोलीस अधीक्षकांना फोन
काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी पोलीस अधीक्षक गोयल यांना फोन करून जेजुरी परिसरातील वाढत्या घरफोडीबाबत चिंता व्यक्त केली. घरफोडीच्या घटनांचा तपास लावण्याचे व भविष्यात अशा घटना घडू नये म्हणून उपाययोजना करण्याच्या सूचना आमदार धंगेकर यांनी पोलीस अधीक्षकांना केली आहे.





