जालन्यात पोलिसांचा सिनेस्टाईल हल्ला, बच्चू कडूंचा संताप, पंकजा मुंडेंनाही लगावला टोला

जालना : जालन्यात स्वातंत्र्यदिनी पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या दौऱ्यादरम्यान घडलेल्या एका धक्कादायक घटनेने संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे. विभागीय पोलीस उपअधीक्षक (DYSP) अनंत कुलकर्णी यांनी आंदोलक शेतकरी अमित चौधरी यांना रस्त्यावर ‘सिनेस्टाईल’ उडी घेत लाथ मारल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
या घटनेने नेटकऱ्यांसह राजकीय नेत्यांमध्ये तीव्र संताप पसरला असून, माजी मंत्री आणि प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते बच्चू कडू यांनी या प्रकरणी तीव्र शब्दांत निषेध व्यक्त केला आहे. तसेच, पंकजा मुंडे आणि भाजपवरही त्यांनी जोरदार टीका केली आहे.
काय आहे प्रकरण?
15 ऑगस्ट रोजी जालना येथे स्वातंत्र्यदिनानिमित्त पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते ध्वजारोहणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी चौधरी कुटुंबातील अमित चौधरी यांनी पंकजा मुंडे यांचा ताफा अडवून आपल्या कौटुंबिक वादाबाबत गाऱ्हाणे मांडण्याचा प्रयत्न केला. त्यांनी पोलिसांवर आरोपींना मदत होत असल्याचा आरोप केला. मात्र, या आंदोलनादरम्यान DYSP अनंत कुलकर्णी यांनी अमित चौधरी यांना थेट रस्त्यावर लाथ मारली. हा प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला आणि सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने पोलिसांच्या वर्तनावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
हा डीवायएसपी आहे की गुंड? बच्चू कडूंचा संताप
प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते आणि आमदार बच्चू कडू यांनी या घटनेचा तीव्र निषेध करताना DYSP अनंत कुलकर्णी यांच्यावर कठोर कारवाईची मागणी केली आहे. हा डीवायएसपी आहे की गुंड? त्याच्या पेकाटवर आम्ही लाथ मारू. शेतकऱ्याला लाथ मारणाऱ्या या अधिकाऱ्याला त्या शेतकऱ्याकडूनच लाथ मारायला हवी, असं बच्चू कडू म्हणाले.
पंकजा मुंडेंनी या घटनेचा निषेध व्यक्त करायला हवं होतं. निवडणुकीच्या वेळी मतं मागायला येतात, पण आता शेतकऱ्यांना लाथ मारली जाते? जगात हुशार असलेले आमचे मुख्यमंत्री स्वतः गृहमंत्री आहेत. त्यांच्या पोलिसांचं हे वर्तन आहे तर सामान्य माणसाचं काय होणार? फक्त निलंबनाने काही होणार नाही, या अधिकाऱ्यावर कठोर कारवाई व्हायला हवी, असंही कडू म्हणाले.
रोहित पवारांचाही संताप
राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार यांनीही या घटनेचा तीव्र निषेध केला आहे. “रस्त्यावर पोलिसांनी अशी विकृत वर्तणूक दाखवली तर कोठडीत काय होत असेल? हा विकृतीचा कळस आहे. सरकारने या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन DYSP वर कठोर कारवाई करावी आणि पीडित शेतकऱ्याला न्याय द्यावा,” अशी मागणी त्यांनी केली.
म्हणून मारली लाथ, DYSP चे स्पष्टीकरण
DYSP अनंत कुलकर्णी यांनी या घटनेवर स्पष्टीकरण देताना सांगितले की, आंदोलक अमित चौधरी गेल्या काही दिवसांपासून जालना जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करत होते. स्वातंत्र्यदिनी पंकजा मुंडे यांच्या दौऱ्यादरम्यान त्यांनी अंगावर रॉकेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला. यावेळी त्यांनी एका महिला पोलीस कर्मचाऱ्यावर रॉकेल टाकले, त्यामुळे बळाचा वापर करून त्यांना ताब्यात घेतले गेले.





