सिनेमास्कोप : नयनतारा उद्या विवाह बंधनात अडकणार!

दाक्षिणात्य अभिनेत्री नयनताराच्या चाहत्यांसाठी उद्याचा दिवस खूपच स्पेशल असणार आहे. नयनतारा गुरुवारी फिल्ममेकर विघ्नेश शिवन याच्यासोबत विवाह बंधनात अडकणार आहे. देशभरामध्ये मोठ्या संख्येने फॅन्स असणाऱ्या दाक्षिणात्य अभिनेत्रींमध्ये नयनताराचे देखील नाव घेतले जाते.
नयनतारा आणि विघ्नेश महाबलीपुरममधील एका रिसॉर्टमध्ये लग्न करणार आहेत. लग्न सोहळ्याबाबत माहिती देताना विघ्नेशने त्याच्या आणि नयनताराच्या लग्नाचा प्लॅन सांगितला. त्यांनी तिरुपती मंदिरात लग्न करण्याचे ठरवले होते मात्र काही कारणास्तव त्यांना लग्नाचे ठिकाण बदलावे लागले. असं विघ्नेश यांनी सांगितलं. नयनतारा आणि विघ्नेशचा लग्नसोहळा कुटुंबीय आणि जवळच्या मित्रांच्या उपस्थितीत पार पडणार आहे. लग्नसोहळ्याचे फोटो सार्वजनिक करण्यात येणार असून 11 जून रोजी नयनतारा आणि विघ्नेश माध्यमांशी संवाद साधतील.
स्टार कपल नयनतारा आणि विघ्नेश 2015 पासून एकमेकांना डेट करत आहेत. नानुम राउडी धान या चित्रपटात एकत्र काम करताना ते एकमेकांच्या जवळ आले होते. विघ्नेशच्या चित्रपटासाठी नयनतारा लकी ठरली. या चित्रपटानंतर विघ्नेशने आपल्या करिअरमध्ये कधीही मागे वळून पाहिले नाही. 2016 मध्ये, या जोडप्याने एका पुरस्कार सोहळ्यात त्यांच्या नात्याची पुष्टी केली. आता 7 वर्षे रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर ते पती-पत्नी होणार आहेत.





