CID season 2: मी तुमचा नवीन एसीपी.! ‘सीआयडी’मध्ये रंगणार नवा अध्याय, ‘या’ अभिनेत्याची झाली एंट्री

CID season 2 : टीव्ही जगतातील सर्वात लोकप्रिय रिअॅलिटी शो ‘सीआयडी २’ मध्ये एक ट्विस्ट आला आहे, ज्यामुळे हा शो पुन्हा एकदा चर्चेत आला. शेवटच्या भागात, एसीपी प्रद्युम्न यांचे निधन झाल्याचे दाखवण्यात आले. म्हणजे हे पात्र संपले आहे आणि आता ‘शिवाजी साटम’ टीव्हीवर या भूमिकेत दिसणार नाहीत. त्याच्यानंतर शोमध्ये एका नवीन पात्राचीही एन्ट्री झाली आहे.
एसीपी प्रद्युम्नच्या मृत्यूची कहाणी आल्यापासून, त्याच्या जागी एक नवीन पात्र शोमध्ये येणार असल्याच्या बातम्या येत होत्या. ते पात्र एका नवीन एसीपीचे असेल. १२ एप्रिल रोजी प्रदर्शित झालेल्या ३३ व्या भागात, निर्मात्यांनी नवीन एसीपीची झलक दाखवली आहे.
खरंतर, शोमध्ये दाखवण्यात आले आहे की पंकज आणि पूर्वीला एका प्रकरणात मदत करण्यासाठी दोन नवीन विशेष महिला पोलिस सीआयडीमध्ये पाठवल्या जातात.
केस सोडवल्यानंतर, पूर्वी दोघांनाही सांगते की तुम्ही दोघेही कायमचे आमच्या टीममध्ये का सामील होत नाही. त्यावर एक पोलिस म्हणतो, “तुमची टीम? मी एसीपीशिवाय सीआयडी पाहिलेले नाही.” मग सीआयडी ब्युरोमध्ये कोणीतरी येण्याचा आवाज येतो.
एक माणूस स्टायलिश पद्धतीने आत येताना दिसतो. त्याला येताना पाहून पंकज विचारतो की तू कोण आहेस? त्यावर तो माणूस जड आवाजात म्हणतो, “तुमचा नवीन एसीपी.” या नवीन एसीपीचा चेहरा अद्याप उघड झालेला नाही, पण हा एसीपी दुसरा तिसरा कोणी नसून अभिनेता पार्थ समथान आहे.
या पात्राचे नाव एसीपी अंशुमन आहे. या पूर्वीच्या बातम्या आल्या होत्या की पार्थ शिवाजी साटमची जागा घेत आहे. आता अशी चर्चा आहे की जरी शोमध्ये प्रद्युम्नचा मृत्यू दाखवण्यात आला असला तरी, भविष्यात त्याला कसे तरी परत आणले जाईल. त्यामुळे आता ही मालिका चांगलीच रंजक होताना दिसत आहे.





