“समुद्र आणि मनुष्यामध्ये गुणसूत्रीय संबंध”

प्रभात वृत्तसेवा पुणे, दि. 14 -गोडे पाणी धरणांद्वारे अडवून ते समुद्रात न जाऊ देण्याचा आत्मघातकी विचार अंमलात आणून मानव आपल्याच पायवर कुऱ्हाड मारून घेत आहे. समुद्र जगला तर आपण जगू, हे त्रिकालाबाधित सत्य आपल्या विस्मरणात गेले आहे. समुद्र आणि मनुष्यामध्ये गुणसूत्रीय संबंध आहेत, हे वास्तव नाकारल्यास येत्या वर्षात समुद्रासह संपूर्ण मनुष्य जमात नामशेष होईल, असे मत सागरी पर्यावरण तज्ज्ञ डॉ. दीपक आपटे यांनी व्यक्त केले.
“महाराष्ट्र मॅनग्रुटह फाउंडेशन’ आणि “वाइल्डलाइफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया’ यांनी महाराष्ट्रात राबवलेला कासवांना सॅटेलाइट लावण्याचा “ऑलिव्ह रिडले’ प्रयोग मांडणाऱ्या “अँटिनावालं कासव’ या लघुपटाचे प्रदर्शन आणि त्यावरील चर्चेचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी ज्येष्ठ अभिनेते डॉ. मोहन आगाशे, लघुपटाच्या लेखक आणि दिग्दर्शक आरती कुलकर्णी, महाराष्ट्र मॅनग्रुटह फाउंडेशनचे मोहन उपाध्ये, किर्लोस्कर वसुंधरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे चेअरमन माधव चंद्रचुड, किर्लोस्कर वसुंधरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे संयोजक वीरेंद्र चित्राव, प्रसाद ठकार आदी उपस्थित होते.
मादी कासव 365 दिवसांपैकी केवळ काही तास समुद्र किनारी येऊन अंडी घालत असतात. त्या तुलनेत नर त्यांचा संपूर्ण जीवनकाळ समुद्रातच व्यथित करून ते समुद्रातच विलीन होत असतात. पर्यटनाच्या नावाखाली कासवांचा अंडी घालण्याचा आधिवास आपण संकटात आणत असून पर्यटकांचा अतिउत्साह नियंत्रणात ठेवणे आवश्यक आहे. समुद्र किनारी वाहने फिरवणे, घोडागाडी चालवणे, उंट फिरवणे यामुळे समुद्र किनाऱ्यांची कासवांना परिचित जमिनीची जडणघडण आपण बिघडवत आहोत. पृथ्वीवरचे आणि समुद्रावरचे जीवन एकमेकांशी परस्परावलंबित्व या तत्वावर आधारित आहे, असे डॉ. आपटे म्हणाले.
“अँटिनावालं कासव’ हा लघुपट कोकणातील सागरी कासवांच्या संवर्धनाची यशोगाथा उलगडणारा आहे. या लघुपटामध्ये कोकणातील जैवविविधतेचे संरक्षण करण्यामध्ये मच्छिमार आणि कार्यकर्ते यांचा असलेला महत्त्वाचा सहभाग तसेच सागरी संवर्धनासाठी असलेला उपाय अधारित दृष्टिकोन मांडला गेला आहे, असे चित्राव म्हणाले.





