लंडन : जगातील सर्वच देशांमध्ये 25 डिसेंबरला ख्रिसमस साजरा केला जातो पण जगाच्या पाठीवर असे एक बेट आहे ज्या ठिकाणी ख्रिसमस 25 डिसेंबर ऐवजी ७जानेवारी रोजी साजरा केला जातो. यंदा सर्व जगाने ख्रिसमस साजरा करून नव्या वर्षाचे स्वागत केले असले तरी या बेटावर मात्र सात जानेवारी रोजी ख्रिसमस साजरा केला जाणार आहे.
‘सेटलॅंड आयलँड’ असे या बेटाचे नाव असून त्याची लोकसंख्या फक्त 30 आहे. या बेटावर ग्रेगोरियन कॅलेंडर न वापरता जुलियन कॅलेंडर वापरण्यात येत असल्यामुळे त्यांचे सर्वच उत्सव सुमारे दोन आठवडे पुढे जातात. याच कारणामुळे या बेटावर 25 डिसेंबर ऐवजी ७ जानेवारी रोजी ख्रिसमस साजरा केला जातो.
ज्युलियस सीझरने सुरू केलेली ज्युलियन कालगणना 1853 पर्यंत इंग्लंडमध्ये कार्यरत होती, पण त्यानंतर जगभरात ग्रेगोरियन कालनिर्णय पद्धती वापरण्यास सुरुवात करण्यात आली पण या बेटाने मात्र अजूनही जुलियन कॅलेंडर प्रमाणे सर्व व्यवहार सुरू ठेवले आहेत. बेटाची लोकसंख्या फक्त 30 असल्यामुळे 7 जानेवारीला गावातले सगळे लोक एका घरात जमतात आणि एकत्रपणेच ख्रिसमस साजरा करतात.
या अनोख्या बेटाचे क्षेत्रफळ 1265 हेक्टर असून पर्यटकांसाठी सुद्धा हे आकर्षणाचे केंद्र आहे. बेटावर इंटरनेटची सुविधा नाही किंवा सामान्य नागरिकांच्या गरजा पूर्ण करणारी दुकानेही नाहीत, त्यामुळे शेजारच्या मोठ्या शहरांमधून समुद्रमार्गेच या बेटावर वस्तू आणल्या जातात. बेटावर विद्युत पुरवठा सुद्धा 1984 मध्ये सुरू करण्यात आला त्यापूर्वी 1982 मध्ये या ठिकाणी नियमित पाणीपुरवठ्याची सोय करण्यात आली. 1980 च्या दशकामध्ये या बेटावर अडीचशे लोक राहत होते पण आता ती संख्या 30 वर येऊन पोहोचली आहे.