पाटणा : बिहारमधील सत्ताधारी एनडीएच्या जागावाटपात लोक जनशक्ती पक्षाला (रामविलास) सन्मानजनक वाटा मिळाला. त्यामुळे त्या पक्षाचे नेतृत्व करणारे केंद्रीय मंत्री चिराग पासवान खुश झाले आहेत. त्यांनी मोठ्या मनाने लहान पक्षांना सामावून घेतल्याबद्दल भाजप, जेडीयू या एनडीएमधील प्रमुख पक्षांचे आभार मानले आहेत. बिहारमध्ये विधानसभेच्या एकूण २४३ जागा आहेत. भाजप आणि जेडीयू प्रत्येकी १०१ जागा लढवणार आहेत. चिराग यांचा लोजप (रामविलास) २९ जागा लढवेल. तर, राष्ट्रीय लोक मोर्चा आणि हिंदुस्थानी अवाम मोर्चा या पक्षांच्या वाट्याला प्रत्येकी ६ जागा आल्या आहेत. बिहारमधील मागील विधानसभा निवडणुकीवेळी (वर्ष २०२०) चिराग आणि जेडीयूचे प्रमुख असणारे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यातील संबंध ताणले गेले. त्यातून चिराग यांचा पक्ष मागील वेळी स्वतंत्रपणे लढला. त्या पक्षाला केवळ १ जागा जिंकता आली. तसे असले तरी एनडीएमध्ये परतलेल्या लोजप (रामविलास) या पक्षाला यावेळी जागावाटपात लक्षणीय वाटा मिळाला आहे. त्यामुळे भाजप, जेडीयूचे आभार व्यक्त करताना चिराग यांनी एनडीएच्या ऐतिहासिक विजयाचे भाकीत केले आहे.