चीनचे परराष्ट्र मंत्री वँग यी येणार भारत दौऱ्यावर
बीजिंग – चीनचे परराष्ट्र मंत्री वँग यी सोमवारपासून दोन दिवसांच्या भारत दौऱ्यावर येणार आहेत. भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्या बरोबरच्या सीमा विषयक चर्चेच्या दुसऱ्या टप्प्याच्या चर्चेसाठी त्यांचा हा भारत दौरा होणार आहे, असे परराष्ट्र मंत्रालयाच्यावतीने आज सांगण्यात आले.
आपल्या भारत दौऱ्यादरम्यान वँग यी भारत-चीन सीमा विषयक चर्चेसाठी नियुक्त विशेष प्रतिनिधींच्या २४ व्या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. या विशेष प्रतिनिधींच्या पथकाचे नेतृत्व भारताकडून अजित डोवाल तर चीनकडून परराष्ट्र मंत्री वँग यी हे करत आहेत. भारत आणि चीन दरम्यानच्या ३,४८८ किलोमीटर लांबीच्या प्रत्यक्ष नियंत्रण रेषेबाबतच्या वादावर तोडगा काढण्यासाठी या विशेष प्रतिनिधींदरम्यान चर्चा सुरू आहे.
ब्रिक्स परिषदेच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांची रशियातल्या कझान शहरात भेट झाली होती. त्यावेळी दोन्ही देशांमधील संबंधांचा आढावा घेण्याविषयी दोन्ही नेत्यांमध्ये सहमती झाली होती. त्यानंतर चर्चेची यंत्रणांचा आढावा घेण्याची प्रक्रिया सुरू झाली.
सीमाविषयीच्या चर्चेच्या २३ व्या फेरीसाठी डोवाल डिसेंबर महिन्यात चीनला गेले होते. दिनांक ३१ सप्टेंबर रोजी चीनच्या तियानजिन शहरात होणाऱ्या शांघाय सहकार्य संघटनेच्या शिखर परिषदेपूर्वी वँग यांचा हा दौरा होत आहे. शिखर परिषदेला पंतप्रधान मोदी उपस्थित राहण्याची अपेक्षा आहे.





