Chinchwad Slum : ६ ते ११ जून दरम्यान रेल्वेची मोठी कारवाई? चिंचवडमधील ‘या’ दोन मोठ्या झोपडपट्ट्यांवर बुलडोझर फिरणार?
Chinchwad Slum : महापालिकेचे विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर यांनी घेतली पत्रकार परिषद; पालिका आयुक्त आणि रेल्वे विभागीय व्यवस्थापकांना पाठवले सविस्तर पत्र.

Chinchwad Slum – चिंचवडमधील दळवीनगर व आनंदनगर रेल्वे हद्दीतील झोपडपट्टीधारकांवर रेल्वे रुंदीकरणासाठी कारवाई करण्यात येणार आहे. मात्र, या झोपडपट्टीधारकांचा झोपडपट्टी पुनर्वसन व निर्मूलन (एसआरए) प्रकल्पात लाभार्थी म्हणून समावेश आहे. त्यामुळे ही कारवाई करण्यापूर्वी त्यांचे योग्य ठिकाणी पुनर्वसन करा, अशी मागणी महापालिकेचे विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर यांनी केली आहे.
या संदर्भात भोईर यांनी पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली. ते म्हणाले की, रेल्वे प्रशासनाकडून ६ ते ११ जूनदरम्ययान ही जागा खाली करण्याची कारवाई होणार असल्याचे समजते. मात्र ही कारवाई करण्यापूर्वी स्थानिक नागरिकांना न्याय मिळावा. पालिका आयुक्त, पुणे रेल्वे विभागीय व्यवस्थापक आणि झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाला सविस्तर पत्र पाठविले आहे.
रेल्वे हद्दीतील रहिवाशांची आधी सखोल आणि पारदर्शक पडताळणी करून पात्र व अपात्र लाभार्थ्यांची निश्चिती करण्यात यावी. जेणेकरून एकही पात्र रहिवासी पुनर्वसनापासून वंचित राहणार नाही. कोणावरही अन्याय होणार नाही. एसआरएअंतर्गंत विकासकांनी ज्या नागरिकांना पात्र ठरवले आहे. त्यांची शहानिशा करून त्यांना तात्काळ सदनिका उपलब्ध करून देण्यात याव्यात.
जोपर्यंत पात्र कुटुंबांना पुनर्वसन सदनिकेचा प्रत्यक्ष ताबा मिळत नाही. तोपर्यंत नियमानुसार मिळणारे दरमहा घरभाडे किंवा भाडे भत्ता रहिवाशांना वेळच्या वेळी देण्यात यावा. सध्या पावसाळा सुरू होत असल्याने आणि नवीन शैक्षणिक वर्षही सुरू होत आहे. त्यामुळे पुनर्वसन व पर्यायी व्यवस्था केल्याशिवाय कारवाई करू नये, अशी मागणी केल्याचे भोईर म्हणाले.





