Chinchwad News: ज्येष्ठ नागरिकांसाठी मोठे सरप्राइज! ‘या’ ठिकाणी सुरू झाला विशेष कट्टा; पाहा काय आहे खास
Chinchwad News: नगरसेवक अनंत कोऱ्हाळे आणि रमामंगल सोशल फाऊंडेशनचे संतोष सौंदणकर यांच्या पुढाकारातून समाजोपयोगी उपक्रम.

Chinchwad News – ज्येष्ठ नागरिकांना आनंदात वेळ घालविता यावा याकरिता चिंचवडगावातील रस्टन कॉलनी व एसकेएफ कॉलनी येथे विरंगुळा कट्टा तसेच वाचनालय उभारण्यात आले आहे. कै. सौ. मंगलताई सौंदणकर यांच्या स्मरणार्थ आणि नगरसेवक अनंत कोऱ्हाळे यांच्या वाढदिवसानिमित्त विरंगुळा कट्टा तसेच वाचनालयाचे लोकार्पण करण्यात आले.
ज्येष्ठ नागरिकांना एकत्र येण्यासाठी, संवाद साधण्यासाठी आणि विरंगुळ्याचे हक्काचे ठिकाण उपलब्ध व्हावे, या उद्देशाने रस्टन कॉलनी व एसकेएफ कॉलनी परिसरात ज्येष्ठ नागरिक कट्ट्याची निर्मिती करण्यात आली. या कामासाठी नगरसेवक निधीचा उपयोग करण्यात आल्याने ज्येष्ठ नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
शिवसेना जिल्हा संघटक तथा रमामंगल सोशल फाऊंडेशनचे सर्वेसर्वा संतोष सौंदणकर म्हणाले, कै. मंगलताई रमाकांत सौंदणकर यांच्या स्मरणार्थ समाजोपयोगी उपक्रम राबविण्याचा आमचा नियमित प्रयत्न असतो. ज्येष्ठ नागरिकांना हक्काचे व्यासपीठ मिळावे आणि त्यांच्या विरंगुळ्यासह त्यांना संवाद साधण्यासाठी एक चांगली जागा उपलब्ध व्हावी, या उद्देशाने हा कट्टा व वाचनालय सुरू कले.
नगरसेवक अनंत कोऱ्हाळे यांनी ही संकल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी सहकार्य केले. भविष्यातही रमामंगल सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येतील. नगरसेवक अनंत कोऱ्हाळे म्हणाले, ज्येष्ठ नागरिक हा आपल्या समाजाचा अनुभवाचा आणि संस्कारांचा मोठा ठेवा आहे.
त्यांना एकत्र येण्यासाठी आणि वेळ सकारात्मक पद्धतीने व्यतीत करण्यासाठी सुविधा उपलब्ध करून देणे ही लोकप्रतिनिधी म्हणून आमची जबाबदारी आहे. रस्टन कॉलनी व एसकेएफ कॉलनीतील नागरिकांची ही गरज लक्षात घेऊन नगरसेवक निधीतून ज्येष्ठ नागरिक कट्टा आणि वाचनालयाची उभारणी करण्यात आली. या सुविधांचा सर्व नागरिकांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा.





