Pune Nashik Railway: लोकप्रतिनिधींनो आता तरी जागे व्हा! पुणे-नाशिक रेल्वेसाठी आता थेट लोकआंदोलनाची तयारी?
Pune Nashik Railway: पुणे-मंचर-अकोले-संगमनेर-नाशिक रेल्वेमार्गासाठी राजकीय मतभेद बाजूला ठेवून सर्वपक्षीय नेत्यांनी एकत्र येण्याची नागरिकांची मागणी.

Pune Nashik Railway – पुणे–मंचर–अकोले–संगमनेर–नाशिक या प्रस्तावित रेल्वेमार्गासाठी सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींनी राजकीय मतभेद बाजूला ठेवून एकत्रितपणे प्रयत्न करण्याची गरज असल्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. या रेल्वेमार्गामुळे पुणे, नगर आणि नाशिक जिल्ह्यांतील लाखो नागरिकांना दळणवळणाची सुविधा उपलब्ध होणार असून औद्योगिक, शैक्षणिक, कृषी आणि पर्यटन क्षेत्रालाही मोठी चालना मिळणार आहे.
नागरिकांच्या मते, या रेल्वे प्रकल्पासाठी माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील,पुणे म्हाडाचे अध्यक्ष शिवाजीराव आढळराव पाटील, खासदार अमोल कोल्हे, भाऊसाहेब वाघचौरे, राजाभाऊ वाजे, मंत्री छगन भुजबळ, आमदार सत्यजित तांबे, बाबाजी काळे, शरद सोनवणे, महेश लांडगे, माणिकराव कोकाटे, अमोल खताळ पाटील, माजी मंत्री बाळासाहेब थोरात, माजी आमदार दिलीप मोहिते, अतुल बेनके यांच्यासह आजी आणि माजी लोकप्रतिनिधींनी एकत्रित भूमिका घेणे आवश्यक आहे.
लोकआंदोलनाची गरज
रेल्वे मार्गाच्या मागणीसाठी केंद्र व राज्य शासनाकडे सातत्याने पाठपुरावा, संयुक्त बैठका आणि लोकआंदोलन उभारण्याची गरज असल्याचे मतही व्यक्त होत आहे. केवळ आश्वासने न देता ठोस कृती आराखडा तयार करून प्रकल्पाला गती देण्याची अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे. सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी आक्रमक भूमिका घेतल्यास या महत्त्वाकांक्षी रेल्वे मार्गाला निश्चितच चालना मिळेल, असा विश्वास शिवसेना नेते रमेशभाऊ येवले आणि नागरिकांनी व्यक्त केला आहे.




