Chinchwad Assembly Election 2024 | राज्यातील विधानसभा निवडणुकीसाठी 20 नोव्हेंबर रोजी मतदान पार पडले. त्यानंतर या निवडणुकीच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले होते. अखेर आज शनिवार 23 नोव्हेंबर रोजी निकाल जाहीर होणार आहे. आज आठ वाजता एकाचवेळी मतांची मोजणी सुरू झाली असून, त्यासाठी निवडणूक आयोगाची यंत्रणा सज्ज झाली आहे. नुकतेच पोस्टल मतमोजणीला सुरुवात झाली आहे. चिंचवड, पिंपरी, भोसरी आणि मावळ या चारही विधानसभा मतदारसंघाच्या मतमोजणीसाठी निवडणूक यंत्रणा सज्ज झाली आहे. चिंचवडमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेस (शरद पवार) पक्षाचे राहुल कलाटे, भाजपचे शंकर जगताप, अपक्ष भाऊसाहेब भोईर यांच्यासह २१ उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले आहे. या मतदार संघात ३,८७,५२० मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे. २९ टेबलवर मतमोजणीच्या एकूण २४ फे-या होणार आहेत. मतमोजणीसाठी १५० कर्मचार्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. २०१९ मध्ये काय झाले होते? विधानसभा २०१९ मध्ये लक्ष्मण जगताप यांनी अपक्ष म्हणून लढलेल्या राहुल कलाटे यांना ३८,४९८ मतांनी पराभूत करत विजयाची हॅट्रिक केली होती. मात्र लक्ष्मण जगताप यांचे जानेवारी २०२३ मध्ये निधन झाल्याने चिंचवडमध्ये पोटनिवडणूक झाली. पोटनिवडणूकीत लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी यांनी ३६ हजार १६८ मतांनी विजय मिळवला होता. महाविकास आघाडीकडून कलाटे यांना उमेदवारी मिळाली नसल्याने त्यांनी बंडखोरी केलेली. याच मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेसकडून विठ्ठल काटेही लढले होते. आता पुन्हा एकदा या मतदार संघात जगताप विरुद्ध कलाटे अशीच लढत पाहायला मिळाली. चिंचवड मतदारसंघाचा निकाल काय सांगतो? पाहा…. मोजणीच्या पहिल्या फेरीपासून शंकर जगताप आघाडीवर असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. ७ व्या फेरीअखेर जगताप ३४ हजार ३२७ मतांनी आघाडीवर आहेत मागील वेळी ५१ टक्के, तर यंदा ५७ टक्के मतदान झाले आहे. या भागातील मतदार ठरवणार आमदार जगताप यांचे वर्चस्व पिंपळे गुरव, जुनी सांगवी, पिंपळे सौदागर या भागामध्ये, तर कलाटे यांचे वर्चस्व वाकड, पुनावळे परिसर, थेरगावच्या काही भागांत आणि भोईर यांचे वर्चस्व चिंचवडगाव, चिंचवडेनगर, वाल्हेकरवाडीमध्ये आहे. आजवरच्या निकालांचा आढावा घेतल्यास काळेवाडी, रहाटणी, रावेत, किवळे या भागांत कोणा एकाचे वर्चस्व राहिलेले नाही. या भागात वाढलेला मतदार कुणाचा ताप वाढवणार, हे निकालात समजणार आहे.