China News : चीनने लष्करासाठी दिली १० लाख ड्रोनची ऑर्डर; तैवानविरोधात मोठ्या युध्दाची तयारी?

China News : चीनच्या कम्युनिस्ट सरकारने आपले सैन्य पीएलएसाठी १० लाख आत्मघाती ड्रोन खरेदी करण्याचे आदेश दिले आहेत. चिनी लष्कराला 2026 पर्यंत हे आत्मघाती ड्रोन मिळणार आहेत. त्या देशाकडून दिल्या गेलेल्या या सगळ्यांत मोठ्या ऑर्डरची सगळीकडे चर्चा सुरू आहे. विशेष म्हणजे हे तेच ड्रोन आहेत ज्यांनी आर्मेनिया-अझरबैजानपासून युक्रेन-रशिया युद्धापर्यंत सर्वत्र कहर केला आहे.
नागोर्नो काराबाखच्या लढाईत पहिल्यांदाच कामिकाझे ड्रोन हल्ला जगाने पाहिला होता. आता चीन त्याची तयारी करत आहे. ड्रोनच्या या भव्य ऑर्डरवरून चीन आता आधुनिक युद्धात त्याचा वापर करणार असल्याचे त्याचे इरादे स्पष्टपणे दिसत आहेत. एकीकडे चीन मोठ्या प्रमाणावर युद्धाच्या तयारीत व्यस्त असताना, संख्या आणि तंत्रज्ञानाच्या बाबतीत भारत अजूनही खूप मागे आहे.
या ड्रोनचे वैशिष्ट्य म्हणजे यात युद्धाची दिशा आणि परिस्थिती बदलण्याची ताकद आहे. अलीकडे हौथी, हिजबुल्लाह आणि इराणने इस्रायलवर मोठ्या प्रमाणात ड्रोन हल्ले केले होते, ज्यामुळे इस्रायलचे बरेच नुकसान झाले होते. हे स्फोटक ड्रोन क्षेपणास्त्रांपेक्षा खूपच स्वस्त आहेत. चीनने ड्रोनची एवढी मोठी ऑर्डर का दिली याबाबत अद्याप फारशी माहिती समोर आलेली नाही.
चीन मोठ्या प्रमाणावर तैवानशी युद्धाची तयारी करत असल्याचे विश्लेषकांचे मत आहे. दुसरीकडे, चीनचे किलर ड्रोन भारतासाठी धोकादायक ठरू शकतात. चिनी उत्पादन कंपनीने सांगितले की ते देशांतर्गत मागणीवर लक्ष केंद्रित करत आहे.
एकीकडे चीन हेरगिरी, इलेक्ट्रॉनिक युद्ध आणि अचूक हल्ल्यांसाठी ड्रोनचा वापर करण्यावर भर देत आहे. त्याचबरोबर भारताने नागास्त्र नावाच्या आत्मघातकी ड्रोनचा समावेश केला आहे. या स्वदेशी कामिकाजी ड्रोनची कामगिरी चांगली झाली आहे. तरीही चीनच्या तुलनेत भारत फंक्शनल ड्रोनच्या शर्यतीत खूप मागे आहे.





