भारतीय औषधांसाठी चीनचे दरवाजे खुले! ३० टक्के आयात शुल्क घटवून थेट शुन्यावर

China | India – चीनने महत्वपूर्ण पाऊल उचलताना भारतीय औषधांसाठी आपले दरवाजे खुले केले. भारतीय औषधांवरील ३० टक्के इतके आयात शुल्क घटवून चीनने थेट शुन्यावर आणले आहे. ती घडामोड अमेरिकेच्या लहरी निर्णयानंतर अतिशय दिलासादायी मानली जात आहे.
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नुकतीच काही औषधांवर तब्बल १०० टक्के आयात शुल्क लावण्याची आणखी एक आडमुठी घोषणा केली. त्या निर्णयाचा प्रतिकूल परिणाम भारताच्या औषध निर्यात क्षेत्रावर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अशात चीनने उचललेले पाऊल त्या क्षेत्राला गुड न्युज देणारे ठरले आहे.
त्यामुळे कुठलेही शुल्क न भरता चीनला औषधे पाठवणे भारतीय उत्पादक आणि निर्यातदार कंपन्यांना शक्य होणार आहे. ती प्रक्रिया सुरळितपणे झाल्यास येत्या काही वर्षांत भारतीय औषधांची निर्यात अब्जावधी डॉलर्सने वाढेल, असा अंदाज तज्ञांकडून व्यक्त करण्यात आला.
अमेरिकेच्या निर्णयामुळे त्या देशाची बाजारपेठ भारतीय औषधांसाठी दुरावण्याची चिन्हे आहेत. अशात चीनच्या पाऊलामुळे भारतीय कंपन्यांना मोठी मागणी असणारी पर्यायी बाजारपेठ उपलब्ध होऊ शकेल. भारतातून जगभरात जेनेरिक औषधे आणि लसींचा पुरवठा होतो. त्यामुळे फार्मसी ऑफ द वर्ल्ड अशी ख्याती भारताने प्राप्त केली आहे.
मात्र, मोठ्या आयात शुल्कामुळे भारतीय औषधांच्या निर्यातीसाठी चीनची बाजारपेठ आव्हानात्मक ठरत होती. मोठ्या लोकसंख्येमुळे चीनमध्ये औषधांची मागणीही मोठी आहे. आता शून्य आयात शुल्कामुळे चीनच्या रूपाने मोठी बाजारपेठ भारतीय औषध कंपन्यांसाठी उपलब्ध होऊ शकेल.
भारतीय औषधांची चीनमधील निर्यात वाढल्यास विविध सकारात्मक बाबी घडू शकतात, असे व्यापार क्षेत्रातील तज्ञांचे म्हणणे आहे. सध्या भारत आणि चीनमध्ये लक्षणीय स्वरूपाचा व्यापार असमतोल आहे. दोन्ही देशांतील व्यापार चीनसाठीच अधिक प्रमाणात अनुकूल आहे.
त्या पार्श्वभूमीवर, भारतीय औषधांची चीनमधील निर्यात वाढल्यास दोन्ही देशांमधील व्यापार बऱ्याच प्रमाणात समतोल पातळीवर येऊ शकेल. त्याशिवाय, भारतात रोजगार निर्मिती वाढेल, महसुलात भर पडेल आणि जागतिक पुरवठा साखळीत भारताची स्थिती आणखी भक्कम होईल, असे तज्ञांना वाटते.





