China News | चीनकडून वारंवार देशाच्या नकाशामध्ये अरुणाचल प्रदेश आणि अक्साई चिन हा त्यांचा भाग असल्याचे दाखवले जाते. मात्र, अरूणाचल प्रदेशवरून भारताने वेळोवेळी आक्रमक भूमिका घेतली आहे. यातच आता बांगलादेशमध्ये छापण्यात आलेल्या नकाशावरून नवीन वादाला तोंड फुटले आहे. बांगलादेशने अरुणाचल प्रदेश आणि अक्साई चिन हा भारताचा भाग असल्याचे स्विकारल्याने चीनने संताप व्यक्त केला आहे. बांगलादेशातील दोन पुस्तकांमध्ये आणि डिपार्टमेंट ऑफ सर्व्हेच्या वेबसाइटवरील आशियाच्या नकाशात अरुणाचल प्रदेश आणि अक्साई चीन भारताचा भाग असल्याचे दाखवण्यात आले आहे. यावर आता चीनने आक्षेप घेतला आहे. मात्र, चीनच्या आक्षेपानंतरही बांगलादेशने यामध्ये कोणतेही बदल करण्यास स्पष्टपणे नकार दिला आहे. याशिवाय, या पुस्तकं आणि वेबसाइटवरील नकाशात हाँगकाँग आणि तैवानला देखील स्वतंत्र देश दाखवल्याने चीनने चिंता व्यक्त केली आहे. चीन या दोन्ही देशांना स्वतःचा भाग मानतो. चीनने काही महिन्यांपूर्वी बांगलादेशला पत्र पाठवून या नकाशा व माहितीमध्ये सुधारणा करण्याची विनंती केली होती. दोन्ही देशांमध्ये यावर चर्चा देखील झाली. मात्र, त्यानंतर चीनने बांगलादेशवर दबाव टाकलेला नाही. चीनने या नकाशावर आक्षेप नोंदवल्यानंतर बांगलादेशाच्या परराष्ट्र मंत्रालयाने शिक्षण मंत्रालय आणि राष्ट्रीय अभ्यासक्रम व पाठ्यपुस्तक बोर्डाशी संपर्क देखील साधला. परंतु, नवीन पुस्तकांची छपाई पूर्ण झाल्याने कोणतेही बदल करणे शक्य होणार नसल्याचे उत्तर देण्यात आले. दरम्यान, हा नकाशा या पूर्वीही बांगलादेशमधील पाठ्यपुस्तकांमध्ये समाविष्ट करण्यात आलेला आहे. मात्र, आता यावर चीनकडून आक्षेप घेतला जात आहे.