India–China border : “चीनने कोणत्याही भारतीय गावावर ताबा मिळवला नाही, चुकीच्या माहितीमुळे देशात संभ्रम निर्माण होतो”; किरेन रिजिजू यांचे स्पष्टीकरण
भारत सरकारने सीमेवरील सुरक्षा व्यवस्था अत्यंत मजबूत केली आहे. भारतीय सैन्य आणि आयटीबीपीच्या जवानांनी गस्त वाढवली आहे.

India–China border – चीनने अरुणाचल प्रदेशात ६० किलोमीटर आत घुसखोरी केल्याचे वृत्त केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी बुधवारी स्पष्ट शब्दांत फेटाळून लावले आहे. सीमेवर काही अडचणी नक्कीच आहेत, पण त्या सीमा रेषेचे स्पष्ट सीमांकन न झाल्यामुळे आहेत, असे त्यांनी स्पष्ट केले.
सीमावर्ती भागातील नागरिकांच्या चिंता रास्त असल्या तरी चुकीची आणि दिशाभूल करणारी माहिती पसरवण्यापासून सर्वांनी लांब राहावे, असा इशाराही त्यांनी दिला. आयएएनएस या वृत्तसंस्थेशी बोलताना रिजिजू म्हणाले, चीन भारतीय हद्दीत ६० किलोमीटर आत आल्याचा दावा करणारे आणि देशाला बदनाम करण्यासाठी विविध व्हिडिओ शेअर करणारे लोक पूर्णपणे चुकीचे आहेत.
अरुणाचलमधील स्थानिक नागरिकांनी व्यक्त केलेली चिंता स्वाभाविक आहे, कारण सीमेचे अधिकृत वाटप झालेले नाही. चीनने कोणत्याही भारतीय गावावर ताबा मिळवलेला नाही, असे सांगत रिजिजू पुढे म्हणाले, सीमा स्पष्ट नसल्याने चीन काही भागांवर दावा सांगतो. आपल्या लोकांचे म्हणणे आहे की आपली जमीन पुढे आहे, तर चिनी सीमेकडील स्थानिक लोक वेगळा दावा करतात. याच अनिश्चिततेमुळे गैरसमज निर्माण होतात.
बांगलादेश किंवा इतर ठिकाणचे व्हिडिओ शेअर करून सैन्याचे मनोबल खचवण्याचे काम काही लोक करत आहेत, याबद्दल त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. चुकीच्या माहितीमुळे देशात संभ्रम निर्माण होतो आणि सीमेवर तैनात असलेल्या सैनिकांवर त्याचा विपरीत परिणाम होतो, असे ते म्हणाले.
भारत सरकारने सीमेवरील सुरक्षा व्यवस्था अत्यंत मजबूत केली आहे. भारतीय सैन्य आणि आयटीबीपीच्या जवानांनी गस्त वाढवली आहे. ‘सर्व्हे ऑफ इंडिया’च्या अधिकृत नकाशांवर अरुणाचल प्रदेशातील २७ ठिकाणांची नावे अधिकृतपणे नोंदवण्याच्या निर्णयानंतर या घडामोडींना महत्त्व प्राप्त झाले आहे.





