घातक शस्त्र नियंत्रणासाठी अमेरिकेबरोबरची चर्चा चीनने थांबवली

बीजिंग – घातक शस्त्र नियंत्रणासाठी अमेरिकेबरोबर सुरू असलेली चर्चा चीनने थांबवली आहे. अमेरिकेकडून सातत्याने तैवानला शस्त्र विक्री केली जात असल्याचा आरोप करून चीनने ही चर्चा थांबवली आहे.
अमेरिकेने तैवानला शस्त्रास्त्रांची विक्री सुरूच ठेवली आहे. तैवान हा चीनचा एक बंडखोर प्रांत असल्याचा दावा चीन करतो आहे. तैवानला बळजबरीने चीनच्या मुख्य भूमीशी पुन्हा एकत्र केले पाहिजे, असे चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते लिन जियान म्हणाले.
चीनच्या विरोधाला न जुमानता अमेरिकेने केलेल्या या कृतीने दोन्ही बाजूंमधील शस्त्रास्त्र नियंत्रण सल्लामसलत सुरू ठेवण्यासाठी आवश्यक असलेल्या राजकीय वातावरणाचे गंभीर नुकसान केले आहे.
त्यामुळे चीनने अमेरिकेशी शस्त्रास्त्र नियंत्रण आणि अप्रसार विषयक सल्लामसलतीची नवीन फेरी आयोजित करण्याबाबतची चर्चा स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे, असे लिन यांनी येथे पत्रकार परिषदेत सांगितले.





