Argentina tour of China : मेस्सीची कृती अर्जेंटिनाला चांगलीच पडली महागात…

हाँगकाँग – स्टार फुटबॉलपटू लिओनेल मेस्सीने हाँगकाँगमधील प्रदर्शनी क्लब सामना वगळल्यामुळे स्थानिक फुटबॉल अधिकाऱ्यांनी पुढील महिन्यात त्यांच्या चीन दौऱ्यावर अर्जेंटिनाचे दोन्ही मैत्रीपूर्ण सामने रद्द केले आहेत. बीजिंग फुटबॉल असोसिएशनने शनिवारी सांगितले की, ते मार्चमध्ये बीजिंगमध्ये आयव्हरी कोस्ट विरुद्ध अर्जेंटिनाच्या मैत्रीपूर्ण सामन्याचे आयोजन करणार होते, मात्र आता काही कारणामुळे त्याचे आयोजन करण्यात येणार नाही.
असोसिएशनने स्थानिक माध्यमांशी बोलताना पुढे सांगितले की, ‘लिओनेल मेस्सी ज्या सामन्यात भाग घेणार होता तो सामना आयोजित करण्याची बीजिंगची सध्या योजना नाही. एक दिवस आधी चिनी क्रीडा अधिकाऱ्यांनी अर्जेंटिनाचा नायजेरियाविरुद्धचा प्रदर्शनीय सामना रद्द केला होता. मेस्सीच्या नेतृत्वाखाली विश्वकरंडक चॅम्पियन अर्जेंटिना १८ ते २६ मार्च दरम्यान आंतरराष्ट्रीय विश्रांती दरम्यान चीनचा दौरा करणार होता. परंतू, आता या दौऱ्याची शक्यता मावळली आहे.
या दौऱ्यात अर्जेंटिनाला बीजिंगमध्ये आयव्हरी कोस्ट आणि हँगझोऊमध्ये नायजेरियाविरुद्ध सामने खेळायचे होते. पण मेस्सीने त्याच्या इंटर मियामी क्लबसोबत दौऱ्यावर असताना हाँगकाँगमधील चाहत्यांना नाराज केले होते. गेल्या रविवारी झालेल्या क्लबच्या मैत्रीपूर्ण सामन्यात तो ‘ग्रोइन’ दुखापतीमुळे खेळला नव्हता आणि बेंचवर बसला होता. त्यामुळे चाहत्यांनी समाजमाध्यमांवरून नाराजी व्यक्त करताना, सामन्याच्या तिकीटांचा परतावा मागितला होता. चाहत्यांचा रोष पाहून स्थानिक फुटबाॅल संघटनेने देखील सामन्याच्या तिकीटाच्या ५० टक्के रकमेचा परतावा करण्याचे जाहीर केले आहे.
#U19WorldCup #AUSvsIND Final : 140 कोटी भारतीयांचे स्वप्न पुन्हा एकदा भंगले…
चीनी चाहत्यांचा तिळपापड..
त्यात चीनमधील या प्रकारानंतर बुधवारी टोकियोमध्ये व्हिसेल कोबेविरुद्धच्या सामन्यात मेस्सी ३० मिनिटे मैदानावर उतरला, त्यामुळे चीनी क्रीडाप्रेमींना त्याच्या दुखापतीच्या बातमीवर विश्वास बसला नाही आणि ते आणखी संतापलेले दिसले. कारण त्यांच्यामते मेस्सीने चीनमध्ये दुखापतीचा बहाना करून जपानमध्ये खेळण्याला प्राधान्य दिले, ज्यामुळे अर्थातच चिनी चाहत्यांचा तिळपापड झाला. त्याच पार्श्वभूमिवर अर्जेंटिना आणि नायजेरिया यांच्यातील मैत्रीपूर्ण सामना शुक्रवारी रद्द करण्यात आला. मेस्सीने नुकताच पॅरिस सेंट-जर्मेनला(पीएसजी) सोडचिठ्ठी देताना इंटर मियामी क्लब जाॅईन केला आहे.





